ब्युरो टीम : राज्य परिवहन महामंडळातर्फे एका परिपत्रकाद्वारे दिव्यांगांना देखील आता एसटी ने मोफत प्रवास करता येणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे दिव्यांग समितीद्वारे स्वागत करण्यात आले आहे.
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांना मोफत एसटी प्रवास, महिलांना सरसकट अर्धे तिकीट हे दोन निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले होते, त्यानंतर दिव्यांगांना देखील राज्यभर मोफत प्रवास करता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिव्यांगत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात काही प्रकारासाठी सातत्याने उपचार करावे लागतात. त्यामध्ये सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलिया यासारख्या प्रकारांचा समावेश होतो. राज्यातील अशा रुग्णांना विविध आरोग्य सेवा आणि उपचारासाठी नियमितपणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च वाढतो. याचा विचार करून या रुग्णांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस मार्फत मोफत प्रवासाची योजना लागू केली आहे.
आरोग्य विभागाने मानले परिवहन मंडळाचे आभार..
एसटी महामंडळाच्या बसने सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस आणि हिमोफेलिया या रुग्णांना आता मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या राज्य शासनाच्या निर्णयामुळे रुग्णांना (दिव्यांग) विनामूल्य प्रवास सवलत मिळाल्यामुळे त्यांचा प्रवास खर्च वाचणार आहे, त्यामुळे या रुग्णांना मोलाची मदत होणार आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने परिवहन मंडळाचे आभार मानले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा