Brij Bhushan Sharan Singh:ब्रिजभूषण सिंहांच्या अडचणीत वाढ; होणार कारवाई! दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल,

 


ब्युरो टीम : कथित लैंगिक अत्याचार प्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणी वाढत आहेत. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे.दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

या आरोपपत्रात म्हटले आहे की, सहा आघाडीच्या कुस्तीपटूंच्या तक्रारींवरील तपासाच्या आधारे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ, विनयभंग आणि पाठलाग करणे यांसारख्या गुन्ह्यांसाठी खटला चालवला जाऊ शकतो. इंडियन एक्स्प्रेसमधील एका रिपोर्टनुसार, १३ जूनच्या आरोपपत्रात कलम ५०६ ( धमकी देणे), ३५४ (महिलेचा विनयभंग करणे), ३५४ अ (लैंगिक छळ) आणि ३५४ डी (पाठलाग) सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एका प्रकरणात ब्रिजभूषण सिंह शरण सिंह यांच्याकडून छळ सतत सुरूच असल्याचे सांगण्यात आले होते.

सहापैकी दोन प्रकरणांमध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कलम ३५४, ३५४अ आणि ३५४ डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कलम ३५४ आणि ३५४ अ अंतर्गत ब्रिजभूषण यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात येते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ५ देशांच्या कुस्ती महासंघांना ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात तपासासाठी व्हिडिओ-फोटो आदी माहिती मागवली होती. इंडोनेशिया, बल्गेरिया, कझाकिस्तान, मंगोलिया आणि किर्गिझस्तानमध्ये झालेल्या स्पर्धांदरम्यान महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये अनेक गंभीर आरोपांचा समावेश आहे. गुन्ह्यांमध्ये व्यावसायिक मदतीच्या बदल्यात सेक्सुअल फेव्हर मागण्याच्या किमान दोन प्रकरणांचा उल्लेख आहे. तसेच, लैंगिक छळाच्या १५ प्रकरणांचाही उल्लेख आहे. दरम्यान, २८ एप्रिलला ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे संतापलेल्या कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर धरणे धरले होते. यामध्ये साक्षी मलिक, बजरंग पुनियासह देशातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते. अखेर पोलिसांनी आता ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने