Chikungunya : चिकुनगुनियाची भीती वाटतेय? घाबरू नका, अशी घ्या काळजी



ब्युरो टीम : ऋतू बदलला की चिकुनगुनिया आजाराचा प्रादुर्भावही वाढतो. चिकुनगुनिया हा डास चावल्यामुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस मादी डास जेव्हा एखाद्या व्यक्तीला चावतो, तेव्हा त्यात आधीपासूनच असलेले विषाणू संबंधित व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात, आणि त्या व्यक्तीला चिकनगुनियाची लागण होते.

चिकुनगुनियाचे डास सहसा दिवसा चावतात. या आजाराची लक्षणं डास चावल्यानंतर 3 ते 4 दिवसात दिसू लागतात. या व्हायरल इन्फेक्शनमध्ये आधी खूप ताप येतो. पण यासोबतच सांध्यांमध्ये खूप तीव्र वेदना होतात. चिकुनगुनियावर अद्याप कोणतेही औषध नाही, मात्र हा आजार बरा करण्यास व्यक्तीचं शरीर सक्षम असतं. परंतू रुग्णाची स्थिती गंभीर असल्यास अशावेळी हॉस्पिटलायझेशन गरजेचं आहे. चिकुनगुनिया हा संसर्गजन्य आजार असून तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो.

चिकनगुनियाची ही आहेत लक्षणं

डास चावल्यानंतर 3 ते 7 दिवसांत चिकुनगुनिया तापाची लक्षणं दिसू लागतात. ताप आणि सांधे दुखी ही या आजाराची मुख्य लक्षणं आहेत. याशिवाय डोकेदुखी, अस्वस्थता, त्वचेवर पुरळ उठणे, थकवा येणे, आदी लक्षणेही या आजाराची आहेत. परंतु डेंग्यू आणि झिका तापातही अशीच लक्षणं आढळतात. पण जर तुम्हाला खूप ताप आणि सांधेदुखी असह्य होत असेल, तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

चिकनगुनियावर उपचार काय?

या आजारावर अद्याप पूर्ण इलाज नाही. पण बहुतेक लोक स्वतःहून बरे होतात. साधारणपणे एका आठवड्याच्या आत चिकनगुनिया बरा होता. परंतु सांधेदुखी दीर्घकाळ टिकते. आयब्युप्रूवेन, पॅरासिटामोल सारखी औषधे ताप कमी करण्यासाठी दिली जातात. जेव्हा चिकनगुनिया होतो, तेव्हा अधिकाधिक द्रवपदार्थांचे सेवन करावे. कारण शरीरात पाण्याची कमतरता असते. भरपूर पाणी प्यायल्यानं ताप आटोक्यात राहतो. हा आजार नवजात बालकांना आणि वृद्धांना अधिक त्रास देतो. याशिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराच्या रुग्णांना या आजारात अधिक त्रास होऊ शकतो.

अशी घ्या काळजी

-    ज्या ठिकाणी चिकुनगुनियाचे जास्त रुग्ण आहेत, त्या ठिकाणी जाऊ नका.

-    संपूर्ण शरीर झाकेल, असे कपडे घाला.

-    चिकनगुनियाचे डास एसी रूममध्ये जात नाहीत.

-    एसी नसलेल्या खोलीत मच्छरदाणीचा वापर करा

-    मॉस्किटो जेल लावा आणि बाहेर पडताना सनस्क्रीन लावा.

-    घरामध्ये आणि आजूबाजूच्या कोणत्याही भांड्यात पाणी साचू देऊ नका.

चिकुनगुनिया आजार झाल्यानंतर घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करणं फायद्याचं ठरतं. हा आजार बरा होत असून याकाळात आराम करणेही गरजेचं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने