ब्युरो टीम: २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये आपली पकड मजबूत करायची आहे आणि त्यासाठी लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी, रामविलास) नेते चिराग पासवान यांच्याशी भाजपची जवळीक वाढत आहे.
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील चिराग पासवान यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. त्यांना केंद्रात मंत्री बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे चिराग पासवान लवकरच NDAचा भाग होणार असल्याचा दावाही पक्षाच्या सूत्रांनी केला आहे. याचा मोदी सरकारला काय फायदा होईल, याबाबत जाणून घेऊया.
संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे. NDA मध्ये पुनरागमन करण्यासाठी चिराग पासवान यांची भाजपसोबतची चर्चा महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी पटना येथे चिराग यांची भेट घेतल्याच्या एका दिवसानंतर, लोजपचे बिहार अध्यक्ष (रामविलास) राजू तिवारी म्हणाले की चिराग यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. त्यांनी टीओआयला सांगितले की पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी जागा वाटपाच्या व्यवस्थेसाठीही चर्चा झाली आहे. ते म्हणाले की LJP (RV) ला बिहारमध्ये हाजीपूरसह लोकसभेच्या सहा आणि राज्यसभेची एक जागा हवी आहे. दोन्ही पक्षांमध्ये एकमत होण्यापूर्वी चिराग भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे
हाजीपूर कोणाचे?
जून 2021 मध्ये एलजेपीच्या 6 पैकी 5 लोकसभा खासदारांना सोबत घेऊन पक्षात फूट पाडणारे चिरागचे काका पशुपती कुमार पारस त्यांच्या मार्गातील अडचण बनू शकतात. कारण हाजीपूर जागेवर दोन्ही गटांचा दावा आहे. पक्षाचे संस्थापक दिवंगत रामविलास पासवान यांनी याच जागेचे अनेकदा प्रतिनिधित्व केले होते. पारस आता लोकसभेत हाजीपूरचे प्रतिनिधीत्व करतात पण चिराग यांना या मतदारसंघाशी संबंधित त्यांच्या वडिलांचा वारसा जपायचा आहे. भाजप पारस यांना कसे सामावून घेईल हे पाहायचे आहे. कारण मुख्यमंत्री नितीश कुमार NDAमध्ये असताना पारस यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.
नितीश यांनी पारसना मदत केली होती!
जदयूच्या अनेक आमदारांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चिराग यांना नितीश कुमार यांना धडा शिकवायचा होता. चिराग यांनी JDU उमेदवारां विरुद्ध अनेक बंडखोर नेत्यांना उभे केले आणि 2020 च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांचे मोठे नुकसान झाले. नितीश आता महाआघाडी सरकारचे नेतृत्व करत असल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशातील बिगर-भाजप पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत असल्याने, JDU नेत्याचा मुकाबला करण्यासाठी भाजपला बिहारमध्ये चिराग यांच्यासारख्या ठाम आणि तरुण नेत्याची गरज आहे.
भाजपला काय फायदा होणार?
राज्यातील तीन विधानसभा जागांसाठी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपचा प्रचार केला असला तरी, सर्व काही ठीक झाल्यास चिराग जवळपास तीन वर्षांनंतर NDA मध्ये परत येईल. भाजपने तीन पैकी दोन जागा जिंकल्या होत्या. चिरागचे एनडीएमध्ये परतणे बिहारमधील 4% पासवान मतांवर आघाडी मजबूत करण्यास मदतीचे ठरेल. पासवान हे राज्यातील दलित समाजातील आक्रमक चेहरा आहेत आणि त्यांमुळे त्याचा भाजपाला मोठा फायदा मिळू शकतो.
टिप्पणी पोस्ट करा