ब्युरो टीम : इलॉन मस्कने विकत घेतल्यापासून ट्विटरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन सुरू करण्यापासून, ते ट्विटरवर पोस्ट पाहण्याला लिमिट लागू करण्यापर्यंत बरेच विवादित निर्णय मस्कने घेतले आहेत.
यातच आता आणखी एका निर्णयाची भर पडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरवर आता डायरेक्ट मेसेज (DM) पाठवण्याला देखील निर्बंध लागू होणार आहेत. ब्लू टिक नसणाऱ्या यूजर्सना आता दिवसाला ठराविक मेसेज पाठवता येणार आहेत. ट्विटरने आपले व्हेरिफाईड यूजर्स वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
किती असणार लिमिट?
अनव्हेरिफाईड यूजर्सना दिवसाला किती मेसेजची लिमिट असणार आहे याबाबत ट्विटरने अद्याप माहिती दिलेली नाही. ज्यांना जास्त मेसेज पाठवायचे आहेत, त्यांनी ब्लू टिक सबस्क्रिप्शन घ्यावं असं ट्विटरने स्पष्ट केलं आहे.
मेसेजिंगमध्ये बदलट्विटरने यापूर्वी डायरेक्ट मेसेजच्या बाबतीत एक नवीन बदल सादर केला होता. या माध्यमातून अनव्हेरिफाईड यूजर्स अशा यूजर्सना मेसेज करू शकत नाहीत, ज्यांना ते फॉलो करत नाहीत. जर व्हेरिफाईड यूजर्सनी आपण फॉलो करत नसलेल्या यूजर्सना मेसेज केला, तर तो दुसऱ्या विशेष इनबॉक्समध्ये जातो.
या फीचरमुळे डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून होणारं स्पॅमिंग ७० टक्के कमी झाल्याचं ट्विटरने स्पष्ट केलं आहे. आता मेसेजिंगसाठी लागू करण्यात आलेल्या लिमिटमुळे हे प्रमाण आणखी कमी होणार असल्याचं ट्विटरने म्हटलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा