Film : सांस्कृतिक खातं राष्ट्रवादीकडे घ्यावं, अशी मागणी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट आणि संस्कृती विभागाने केली



ब्युरो टीम : महाराष्ट्रात अजित पवार  यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकदा सत्तेत आला आहे. दरम्यान, खातेवाटप अद्याप झालेलं नसून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांमध्ये सांस्कृतिक खातं राष्ट्रवादीकडे घ्यावं, अशी मागणी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट आणि संस्कृती विभागानं केली आहे. पक्षाच्या चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी यासंदर्भात पक्षाला पत्रं लिहिलं आहे. अशा प्रकारची मागणी करण्यामागचा हेतू राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सतत कलावंताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचं पत्रात म्हटलं आहे. 

गेल्या सरकारमध्ये सांस्कृतिक खातं हे काँग्रेसच्या वाट्याला आलं होतं. त्यावेळी सांस्कृतिक खातं सांभाळणारे मंत्री निष्क्रिय असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागानं केला होता. त्यावेळी अनेकदा अजितदादांनी कलावंतांसाठी मदत करण्याचे प्रयत्न केले असले तरी सुद्धा सांस्कृतिक खातं त्यावर तात्काळ निर्णय घेण्यात अपयशी ठरत होतं, असा आरोप राष्ट्रवादी चित्रपट विभागानं केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागानं गेल्या चार वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्याची मागणी सातत्यानं केली होती. चित्रपट विभागाचं स्वतंत्र कामगार कार्यालय बनवावं. त्याअंतर्गत युनियनचे रजिस्ट्रेशन करून युनियनच्या मार्फत सिने कलाकार आणि तंत्रज्ञ आणि त्या संदर्भातील सर्व कामगारांचे प्रश्न सोडवावेत, असा आग्रहसुद्धा वारंवार करण्यात आला होता.

राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्या मागण्या काय? 

सिंगल चित्रपटगृह बाबतीत ज्या काही जाचक अटी शासनाने लावलेल्या आहेत, त्या अटी शिथिल करून नव्याने त्या चित्रपटगृह मालकांना नवीन उद्योग आणि व्यवसाय चालू करण्याबाबत परवानग्या द्याव्यात.

महाराष्ट्रातील लोककलावंतांसाठी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. 

स्व. विठाबाई नारायणगावकर यांचे स्मारक जुन्नर येथील नारायणगाव येथे उभे करण्यात यावे. 

मुंबई, पुणे येथे कलाकार मोठ्या प्रमाणावर शुटींगसाठी येत असतात, त्यांच्यासाठी कलाकार भवन उभे करण्यात यावे. 

लावणीच्या नावाखाली जे बिभत्स नृत्याचे प्रकार चालू आहेत त्यांच्यावर कुठेतरी कायद्याचा अंकुश राहिला पाहिजे यासाठी लावणीच्या कार्यक्रमांसाठी सेन्सॉर लवकरात लवकर सुरू करावे. 

ज्याप्रमाणे तमाशा कलावंतांच्या बॅनरला व्यावसायिक तत्वावर अनुदान शासनाकडून मिळलं जातं. तसं गावोगावी जाऊन यात्रा जत्रा करणारे व्यावसायिक लावणी सादर करणारे बॅनर रेग्युलर कार्यरत आहेत. अशा बॅनर्सलासुद्धा शासनाकडून अनुदान मिळावे. 

महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध कलावंतांच्या पेन्शनसाठी 48 हजार रुपयेचा असलेला दाखल्याची अट बदलून ती एक लाख रुपये उत्पन्नाचा दाखला करावी.

ITI मार्फत नाट्य, चित्रपट उद्योगास आवश्यक असणारे बॅकस्टेज आर्टिस्ट यांचे प्रशिक्षण सुरु करून त्यांना कुशल कामगार म्हणून मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासनाकडून वृद्ध कलावंतांना जी पेन्शन मिळते त्या पेन्शनमध्ये वाढ करावी. 

अजित पवार न्याय देतील : प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील

अनेक वर्षांपासून आपण या प्रश्नांसाठी पाठपुरावा करत आहोत. यासाठी गेल्या अनेक वर्षांत सतत सांस्कृतिक मंत्रालयाच्या चकरा मारत असल्याचं बाबासाहेब पाटील म्हणाले आहेत. अजित दादा सतत या सर्व मागण्यांसाठी नेहमीच आग्रही असतात. दादांना कलावंतांविषयी असलेल्या प्रेमामुळेच परत आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळीसुद्धा दादांमुळे कलावंतांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दादांमुळे कलाकारांना नक्कीच न्याय मिळेल, अशी अपेक्षा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने