ब्युरो टीम : गुगल कर्मचार्यांना मोठ्या प्रमाणात पगार देत असल्याचं म्हटलं जातं. त्यातच आता हे पगाराचे आकडे बिझनेस इनसाइडरनं लीक केल्यानं समोर आलेत. त्यानुसार गुगलनं 2022 मध्ये कर्मचाऱ्यांना सरासरी 2 लाख 79 हजार 802 डॉलर म्हणजे 2.30 कोटी रुपये पगार दिलाय. विशेष म्हणजे, 2022 मध्ये 718,000 डॉलरच्या कमाल बेस पगारासह सॉफ्टवेअर इंजिनीअर हे गुगल कंपनीत सर्वाधिक कमाई करणारे ठरलेत. ही माहिती कंपनीच्या अंतर्गत स्प्रेडशीटमधून समोर आलीय. या अंतर्गत डेटामध्ये 12,000 हून अधिक यूएस कामगारांच्या माहितीचा समावेश आहे.
सॉफ्टवेअर इंजिनीअर, बिझनेस अॅनालिटिक्स, सेल्स पर्सन आदींच्या पगाराचा या डेटात समावेश आहे. लीक झालेल्या डेटाचा विचार केला तर, इंजिनीअरिंग, बिझनेस आणि सेल्स विभागात गुगलमध्ये काम करणाऱ्या पहिल्या दहा टॉप पदांसाठी दिला जाणारा पगार हा सहा आकडी अर्थात कोटीच्या घरात आहे. विशेष म्हणजे, गुगलच्या नुकसानभरपाईच्या संरचनेत स्टॉक पर्याय आणि बोनस देखील समाविष्ट आहेत. हे मूळ वेतनाच्या अतिरिक्त दिलं जातं. त्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनीअरला 2022 मध्ये इक्विटीमध्ये 1.5 दशलक्ष डॉलरपर्यंत कमावण्याची संधी मिळाली.
कोणत्या पदाला किती दिला पगार?
2022 मध्ये गुगलनं सॉफ्टवेअर इंजिनीअरला 5.90 कोटी, इंजिनीअरिंग मॅनेजरला 3.28 कोटी, एंटरप्राइज डायरेक्ट सेल्स 3.09 कोटी, लीगल कॉर्पोरेट काउंसिल 2.62 कोटी, सेल्स स्ट्रॅटेजी 2.62 कोटी, डिझाइन 2.62 कोटी रुपये पगार दिलाय. तसेच, सरकारी व्यवहार आणि सार्वजनिक धोरण पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला 2.56 कोटी, संशोधन वैज्ञानिकाला 2.53 कोटी, क्लाउड सेल्स पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला 2.47 कोटी, आणि प्रोग्रॅम मॅनेजरला 2.46 कोटी पगार दिलाय.
मात्र, हा डेटा केवळ गुगल कंपनीत यूएसमधील जे कर्मचारी पूर्णवेळ काम करतात, त्यांच्याच पगाराचा आहे. तसेच या डेटामध्ये मर्यादित कर्मचाऱ्यांची माहिती आहे. या डेटामध्ये गुगलची मुळ कंपनी अल्फाबेटच्या इतर कर्मचाऱ्यांचा पगाराचा समावेश नाही. तसेच जर माय लॉग आय क्यू (MyLogIQ) द्वारे संकलित केलेल्या 2022 चा डेटा पाहिला आणि वॉल स्ट्रीट जर्नलनंच विश्लेषण विचारात घेतलं, तर मेटा कंपनी कर्मचाऱ्यांना सरासरी 300,000 डॉलर पगार देत असल्याचं समोर आलं आहे. ही कंपनी कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त पगार देण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर होती. तर, या यादीत गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट कर्मचाऱ्यांना सरासरी 280000 डॉलर पगार देत तिसऱ्या स्थानावर होती.
टिप्पणी पोस्ट करा