ब्युरो टीम : निरोगी शरीरासाठी योग्य आहार योग्य वेळी घेणं महत्त्वाचं आहे. त्यादृष्टीनं प्रत्येकानं दैनंदिन नियोजन करणं गरजेचं आहे. परंतु जीवनशैलीतील विस्कळीतपणामुळे, बहुतेक लोकांना आहार घेण्याची वेळ पाळणं कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत दुपारचे जेवण आणि रात्री उशिरा जेवण्याची सवय लागणेही स्वाभाविक आहे, पण ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे निरोगी शरीर राहण्यासाठी जेवणाची योग्य वेळ काय आहे, याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुमचं शरीर अशा यंत्रणेवर कार्य करते जे सर्काडियन सिस्टीम किंवा अंतर्गत जैविक घड्याळावर अवलंबून असते. जीवनशैलीतील विस्कळीतपणामुळे ही लय बिघडते. याची सुरुवात उशिरा उठण्यापासून होते, उशिरा उठल्याने शरीराच्या अंतर्गत घड्याळाची वेळ तशीच पुढे जाते आणि सर्व क्रिया उशिराने होऊ लागतात.
संशोधनात असं दिसून आलं आहे की, जरी तुम्ही दिवसभरात कमी कॅलरी वापरण्याचं उद्दिष्ट ठेवलं असलं तरी, तुमच्या जेवणाची वेळ योग्य नसेल तर त्यामुळे अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. तुमच्या भूकेमध्ये घ्रेलिन हार्मोनची विशेष भूमिका असते, हा हार्मोन तुमच्या मेंदूला भूक लागल्याचे संकेत देऊन जेवणाची वेळ झाल्याचे एकप्रकारे सूचवत असतो. पण जेव्हा उशिरा जेवणाची सवय लागते, त्यातही विशेषत: रात्री उशीरा जेवणाची सवय असेल, तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतात.
जेवणाची निश्चित वेळ कशी ठरवावी?
काही आहारतज्ज्ञ यांच्या मते, ‘जेवणाची वेळ निश्चित करण्यासाठी, तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय लावणं आवश्यक आहे. रात्रीचं जेवण अशा वेळी असलं पाहिजे, ज्यानंतर तुम्ही पुढील 12-16 तास उपवासाच्या स्थितीत म्हणजे कोणतेही अन्न न ग्रहण करता, राहू शकता. याचा अर्थ जर तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण रात्री 8 वाजता केलं, तर तुम्ही नाश्ता 8-9 च्या दरम्यान करू शकता. कारण शरीराला हार्मोन्स आणि चयापचय प्रक्रियांचे नियमन करण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर 12 तासांचे अंतर आवश्यक आहे.
तर, जर्नल न्यूट्रिएंट्समध्ये जुलै 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं म्हंटले आहे की, ‘रात्री उशिरा खाल्ल्यानं चयापचय आणि रक्तातील साखर दोन्हीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. संशोधकांचे म्हणणं आहे की, दिवसा उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे रक्तातील ट्रायग्लिसराइडची समस्या देखील वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. याशिवाय खाण्याच्या सवयींचा सर्वात आधी चयापचयावर परिणाम होतो, ज्याचे थेट दुष्परिणाम पचनाची समस्या आणि लठ्ठपणा या स्वरूपात दिसू शकतात.
टिप्पणी पोस्ट करा