IND vs PAK World Cup 2023: पाकिस्तान म्हणतोय भारतात येऊन सुरक्षेची तपासणी करणार, पाकिस्तानचं आता नवं नाटक



ब्युरो टीम: भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. यावेळी पाकिस्तानने सामन्यांची ठिकाणे बदलण्याची केलेली विनंती आयसीसीने धुडकावून लावली. यानंतर पाकिस्तानने भारतात वर्ल्डकप खेळायला जायचं की नाही याचा निर्णय पाकिस्तान सरकारवर सोपवला.

आता पाकिस्तान सरकार वर्ल्डकप खेळण्यासाठी संघ पाठवायचा की नाही याचा निर्णय घेण्यापूर्वी भारतातील सामने होणाऱ्या ठिकाणांची सुरक्षा पडताळणी करणार आहे. यासाठी पाकिस्तान सरकार एक पथक भारतात पाठवणार आहे.

पाकिस्तान क्रीडा समन्वय मंत्रालयाच्या एका सूत्राने सांगितले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे चेअरमन नियुक्त झाल्यानंतर आम्ही भारतात सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पथक पाठवणार आहोत. चेअमनची नियुक्ती ईदच्या सुट्ट्यांनंतर करण्यात येणार आहे.

सूत्रांनी सांगितले की, 'पाकिस्तानचं एक पथक पीसीबीच्या प्रतिनिधींसोबत वर्ल्डकपचे सामने होणाऱ्या ठिकाणांची सुरक्षा कशी आहे याचा आढावा घेण्यासाठी पाठवण्यात येईल.' त्यांनी सांगितले की हे पथक, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता आणि अहमदाबाद या ठिकाणांची सुरक्षा तपासणार आहे. भारत पाकिस्तान सामना हा हैदराबाद येथे 15 ऑक्टोबरला होणार आहे.

पाकिस्तान क्रीडा समन्वय मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'भारताचा कोणताही दौरा करण्यापूर्वी क्रिकेट बोर्ड सरकारकडे परवानगी मागते ही एक सामान्य प्रक्रिया आहे. अशावेळी सर्वसाधारणपणे सरकार सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक पथक भारतात पाठवते.'

ते पुढे म्हणाले की, 'हे पथक तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करेल. त्यानंतर खेळाडूंची, अधिकाऱ्यांची, चाहत्यांची आणि माध्यमांसाठीच्या सुरक्षा आणि इतर सुविधांचा आढावा घेईल. यानंतर जर काही अडचणी असतील तर पीसीबी याचा अहवाल आयसीसी आणि बीसीसीआशी शेअर करेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने