ब्युरो टीम : सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'जेलर' चित्रपटातील 'हुकुम' या नवीन गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. आता या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसं चित्रपटाचं प्रमोशनही जोरात सुरू आहे. नुकतेच त्यांच्या जेलर चित्रपटातील 'कावाला' हे गाणे प्रदर्शित झाले होते. आता 'हुकुम' या नव्या गाण्याचा टीझर रिलीज झाला असून, संपूर्ण गाणे देखील लवकरच रिलीज होणार आहे. या गाण्याच्या टीझर व्हिडीओमध्ये रजनीकांत तुरुंगातून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांच्याभोवती बंदूक आणि रिव्हॉल्व्हर ठेवलेल्या दिसत आहेत. हे गाणे अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतबद्ध केले आहे.
या गाण्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत त्यांनी लिहिले की, 'हुकुमचा टीझर आऊट झाला आहे. रजनीकांतच्या धमाक्यासाठीही तयार व्हा.' यापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर मे महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे शूटिंग केरळ आणि हैदराबादमध्ये झाले आहे. हा एक कॉमेडी आणि थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात रजनीकांत जेलरच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण तीन तुरुंगात झाले आहे.
नुकतेच या चित्रपटातील 'कावाला' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र, आता या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. संगीतकार अनिरुद्ध रविचंदरने एमजी रामचंद्रन यांच्या चित्रपटातील गाण्याची धून चोरल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. या चित्रपटात रजनीकांतशिवाय तमन्ना भाटिया आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. रजनीकांत आणि तमन्ना भाटिया पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. दोघांची जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक झाले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा