Jitendra avhad : जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्वीट शरद पवारांनी विकेट घेतली हे १०-१५ दिवसांनी..!",

 


ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट बघायला मिळत आहेत. २ जुलै २०२३ ला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर या पक्षातला उभा दावा समोर आला आहे.

५ जुलै २०२३ ला राष्ट्रवादीच्या दोन सभा पार पडल्या. पहिली अजित पवारांची आणि दुसरी शरद पवारांची. अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्या निवृत्तीचं वयच काढलं. तर शरद पवार यांनी संयमाने उत्तर देत आपल्या सभेतून या सगळ्या बंडावर फारसं बोलणं टाळलं आहे. आता या सगळ्या घडामोडींना साधारण १५-१६ दिवस झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सूचक ट्वीट केलं आहे.

काय म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाड?

पुरोगामी महाराष्ट्राचा एकमेव आवाज.शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा खरा प्रतिनिधी, आणि राजकारणात संयमाला किती महत्त्व आहे हे कोणाकडून शिकावं? एकच नाव शरद पवार. कोणाची विकेट कशी गेली हे विकेट गेलेल्या माणसालाही समजत नाही. १०-१५ दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली. बंडाला १५ दिवस झाल्यावर हे ट्वीट आव्हाडांनी केल्यामुळे आता कुणाची विकेट जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अजित पवार गट आणि त्यांचे आमदार हे गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार यांना भेटत आहेत. त्याचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार गटाला अजित पवार आणि त्यांचे आमदार का भेटत आहेत? याची चर्चा होते आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले असून त्यानुसार दोन प्रतोद, दोन विधिमंडळ गटनेते आणि इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती दोन्ही गटांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गट व शिंदे गटाप्रमाणेच सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती झाली आहे. त्यामुळे सोमवार अर्थात आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात नेमकं काय चित्र दिसणार? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. त्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी रविवारी दुपारी वाय. बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांची भेट घेतली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

सोमवारी काय घडलं?

अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांनी वाय. बी. चव्हाण सेंटरवर भेट घेतली. यावेळी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरेही उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय? यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

"आज अजित पवार व विधिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी वाय बी चव्हाण सेंटरला आले होते. आम्ही सगळे इथे आलो. काल अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी इथे आलो होतो. काल रविवार असल्यामुळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधिमंडळाचं अधिवेशन चालू झाल्यामुळे बरेच आमदार आज इथे हजर होते. त्यामुळे आमदारांना शरद पवारांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही इथे आलो", असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने