ब्युरो टीम : अभिनेते कमल हसन यांचा १९९६ साली ब्लॉकबस्टर ठरलेला 'इंडियन' या चित्रपटाचा सीक्वल 'इंडियन २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तब्बल २७ वर्षांनंतर या चित्रपटानिमित्ताने दिग्दर्शक शंकर व कमल हसन पुन्हा एकत्र काम करत आहेत.
दरम्यान, या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच मोठा धमाका केला आहे. 'इंडियन २' या चित्रपटाचे ओटीटी अधिकार मोठ्या किमतीला विकल्याचं समोर आलं आहे.
'ट्रॅक टॉलीवूड' नावाच्या वेब साईटनुसार, कमल हसन यांच्या 'इंडियन २'या चित्रपटाचे ओटीटी अधिकार नेटफ्लिक्सला तब्बल २०० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. यामागचे कारण दिग्दर्शक शंकर असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या '२.०' या चित्रपटाला देशासह जगभरातील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. '२.०' या चित्रपटाने जगभरातून जवळपास ७०० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे शंकर यांच्या आगामी 'इंडियन २' या चित्रपटाचा बोलबोला सुरू आहे.
दिग्दर्शक शंकर यांनी या चित्रपटासाठी डी-एजिंग टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. ही टेक्नोलॉजी रॉबर्ट डी निरो आणि अल पचीनो यांच्या 'द आयरिशमॅन' चित्रपटात वापरली होती. या टेक्नोलॉजीद्वारे कलाकाराचे वय कमी करून दाखवले जाते. जास्त करून या टेक्नोलॉजीचा वापर चित्रपटात भूतकाळातील घटना दाखवण्यासाठी केला जातो.
दरम्यान, १९९६ साली प्रदर्शित झालेल्या 'इंडियन' या चित्रपटातील काही कलाकार या नव्या चित्रपटातही असणार आहेत. त्यांना एआयच्या मदतीने 'इंडियन २' चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात कमल हसन यांच्या व्यतिरिक्त काजल अग्रवाल, सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंग, बॉबी सिम्हा, समुतिरकनी, विद्युत जामवाला आणि वेनेला किशोर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून सध्या पोस्ट-प्रोडक्शनचे काम सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा