ब्युरो टीम : एकविसाव्या शतकातही अनेक देशांमध्ये अगदी विकसित देशातही राजघराणी आहेत. काही राजघराणी तर शेकडो वर्षांपासून संबंधित देशांमध्ये राज्य करीत आहेत. ब्रिटनचं राजघराणं तर जगभरात प्रसिद्ध आहे. त्यातच आता ब्रिटनमध्ये एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. आज राजा चार्ल्सचा राज्याभिषेक होणार आहे. ब्रिटनमध्ये गेल्या 70 वर्षांतील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातोय. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाबाबत नागरिकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळतोय. पण तुम्हाला माहिती आहे का, ब्रिटनच्या राजघराण्याचा समावेश जगातील पाच श्रीमंत राजघराण्यांमध्ये होतो. जगातील पाच श्रीमंत राजघराण्यांपैकी चार अरब देशांतील आहेत. या यादीत स्थान मिळवणारे एकमेव बिगर अरबी कुटुंब म्हणजे ब्रिटिश राजघराणे. अशाच जगभरातील पाच श्रीमंत राजघराण्यांची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
अबूधाबीचं राजघराणं
अबुधाबीवर अल नाह्यान राजघराण्याची सत्ता आहे. या राजघराण्याचे प्रमुख शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान हे अबूधाबीचे सर्वात श्रीमंत आणि 2004 पासून यूएई चे अध्यक्ष आहेत. ते अबूधाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष देखील आहेत. ही संस्था जवळपास 696 अब्ज डॉलर किंमत असणाऱ्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवते. अबूधाबीच्या राजघराण्याची एकूण संपत्ती 150 अब्ज डॉलर आहे. या संपत्तीमधील बहुतांश हिस्सा हा तेलातून येतो. या राजघराण्याकडे लंडनमध्ये 7.1 अब्ज डॉलर्सची स्थावर मालमत्ता आहे. जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांच्या यादीत हे कुटुंब चौथ्या क्रमांकावर आहे.
कुवेतचं राजघराणं
आखाती देश कुवेतचं राजघराणं जगातील दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत राजघराणं आहे. त्यांचे प्रमुख कुवेतचे सध्याचे सर्वात श्रीमंत शेख सबाह अहमद अल जाबर अल सबाह आहेत. अल सबाह राजघराणं 1752 पासून कुवेतवर राज्य करत आहे. या राजघराण्यानं अमेरिकेतील सर्व मोठ्या ब्लू-चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून खूप संपत्ती कमावली आहे. या कुटुंबाची एकूण संपत्ती 360 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अर्नॉल्टच्या संपत्तीपेक्षा ही 154 अब्ज डॉलरनं अधिक आहे.
कतारचं राजघराणं
कतारचं राजघराणं जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कतारवर 19व्या शतकाच्या मध्यापासून थानी घराण्याचं राज्य आहे. सध्याचे श्रीमंत शेख तमीम बिन हमाद अल थानी 2013 मध्ये सिंहासनावर आरूढ झाले. या कुटुंबाची संपत्ती 335 अब्ज डॉलर आहे. या घराण्यानं अनेक रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केलीय. यामध्ये लंडनमधील शाही गगनचुंबी इमारत, ऑलिम्पिक व्हिलेज आणि हॅरॉडचे लंडनमधील डिपार्टमेंटल स्टोअर यांचा समावेश आहे. न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंग, बार्कलेज, ब्रिटिश एअरवेज आणि फोक्सवॅगनमध्येही या कुटुंबाची गुंतवणूक आहे.
जगातील सर्वात प्रभावशील राजघराणं
ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा यांचा आज (6 मे 2023) राज्याभिषेक होतोय. गेल्या वर्षी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांना राजा बनवण्यात आलं होतं. ब्रिटीश राजघराणं हे एकेकाळी जगातील सर्वात शक्तिशाली कुटुंब होते. त्याची राजवट जगातील अनेक देशांमध्ये पसरली होती. त्यांच्या सत्तेत सूर्य कधीच मावळत नाही, असं म्हटलं जातं. म्हणजेच त्याची राजवट जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पसरलेली होती. विशेष म्हणजे हे अजूनही जगातील सर्वात प्रभावशाली राजघराणं आहे. पण ब्रिटिश राजघराणं हे जगातील सर्वात श्रीमंत राजघराणं नाही.
88 अब्ज डॉलर्सची संपत्ती
ब्रिटिश राजघराण्याची कमान आता राजा चार्ल्सच्या हाती आहे. हे कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असले तरी जगातील सर्वात प्रभावशाली राजघराणं आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, ब्रिटिश राजघराण्याकडे सुमारे 88 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. या राजघराण्याच्या उत्पन्नातील बहुतांश हिस्सा हा सॉवरेन ग्रांट म्हणजेच अनुदानातून येतो. याशिवाय, या राजघराण्यानं अनेक रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्येही गुंतवणूक केलीय.
हे आहे जगातील सर्वात मोठं राजघराणं
जगातील सर्वात श्रीमंत राजघराणं म्हणून सौदी राजघराणं ओळखलं जातं. सौदी राजघराण्याच्या संपत्तीसमोर इतर कोणत्याही राजघराण्याची स्पर्धा होऊ शकत नाही. हे राजघराणं 1744 पासून सौदी अरेबियावर राज्य करत आहे. एका अंदाजानुसार, या घराण्याची एकूण वैयक्तिक संपत्ती सुमारे 1.4 ट्रिलियन डॉलर म्हणजे सुमारे 111 लाख कोटी रुपये आहे. ही संपत्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्टपेक्षा सुमारे सात पट जास्त आहे. अर्नॉल्टची एकूण संपत्ती सध्या 206 अब्ज डॉलर आहे. या राजघराण्यात अनेक सदस्य असले तरी किंग सलमान अल सौद यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे.
टिप्पणी पोस्ट करा