Lord Shiva : भगवान शंकराला का म्हणतात स्मशानभूमीचा देवता? जाणून घ्या



ब्युरो टीम : सध्या अधिकमास सुरू असून लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची विविध रुपांची पूजा करण्यात येते. त्यामधीलच एक रुप म्हणजे स्मशानभूमीत राहणारे भगवान शंकर. खरतर, भगवान शंकराला स्मशानभूमीत राहण्यातून नेमका जगाला काय संदेश द्यायचा आहे? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. चला तर, हे आज आपण जाणून घेऊ.

भगवान शिव स्मशानभूमीत का राहतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरतर, शंकराला सामान्यतः कुटुंबाचे दैवत म्हटलं जातं. म्हणूनच अनेकजण पूजास्थळी शिवशंकराची मूर्ती किंवा चित्र ठेवतात. पण, भगवान शिव प्रापंचिक असूनही स्मशानभूमीत राहतात. वास्तविक, संपूर्ण जग किंवा आपलं कुटुंब हे भ्रमाचे प्रतीक आहे, तर स्मशानभूमी हे शांततेचं प्रतीक मानलं जातं. जर तुम्ही एखाद्याच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेला असाल, तर तुमच्या मनात विचार आला असेल की, जीवनाचा शेवट इथेच आहे. सनातन धर्मात या विचारसरणीला क्षणभंगुरता म्हटलं आहे. भगवान शिवाच्या स्मशानभूमीत राहण्यामागे प्रत्येक जीवाच्या जीवन व्यवस्थापनाचं सूत्र दडलं आहे.

भगवान शंकराचे स्मशानभूमीत राहणं हे सांगते की, प्रत्येक व्यक्तीनं संसारात राहून स्वतःचं प्रत्येक कर्तव्य पूर्ण निष्ठेनं केलं पाहिजे. पण, त्यासाठी भ्रमात अडकण्याची गरज नाही. थोडक्यात शिवाचे हे रूप शिकवतं की, जीवनात प्रत्येक गोष्ट करताना मन आणि आत्म्यामध्ये अनास्था अंगीकारली पाहिजे. हे जग नश्वर आहे. तुमच्या जीवनातील सर्व काही एक दिवस नष्ट होईल. त्यामुळेच संसारात राहूनही कोणाशी आसक्त राहू नये. एखाद्या व्यक्तीनं कोणत्याही आनंद किंवा वस्तूशी संलग्न नसावे. यात आणखी एक धडा दडलेला आहे तो म्हणजे, माणसानं चांगल्या-वाईट परिस्थितीत समान राहावे.

स्मशानभूमीत राहण्यामागे धार्मिक श्रद्धा

स्मशानभूमीत भगवान शंकर राहण्यामागे एक धार्मिक धारणा आहे. वास्तविक सनातन धर्मात शंकराला विश्वाचा संहारक मानलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार, हे जग निर्माण होते व पुन्हा नष्ट होते. ब्रह्मदेव विश्वाची निर्मिती करतात. भगवान विष्णू विश्वाची देखभाल करतात. तर कलियुगाच्या शेवटी भगवान शिव विश्वाचा नाश करतात. आपल्या सर्वांना माहित आहे की, स्मशानभूमीत जीवनाचा अंत होतो. तिथे सर्व काही जळून खाक होते. म्हणूनच शंकराचे वास्तव्य असं स्थान स्मशानभूमी आहे, जिथे मानवी शरीर, त्या देहाशी निगडित सर्व नातेसंबंध, प्रत्येक आसक्ती आणि सर्व प्रकारची बंधने संपतात. मृत्यूनंतर आत्मा शिवामध्येच विलीन होतो. म्हणूनच शिव स्मशानभूमीत राहतात, आणि तो स्मशानभूमीची देवता म्हणून ओळखला जातो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने