Maharashtra Cabinet Expansion: निर्णय दिल्ली दरबारी होणार? अजित पवार रवाना; खातेवाटपाचा वाद अमित शाहांच्या कोर्टात!

 


ब्युरो टीम:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळाली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असे सांगितले जात होते.
मात्र, खातेवाटपावरून एकमत होत नसल्याने हा तिढा सुटताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास शिंदे गटासह मित्र पक्षांचा विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही खात्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे दिसत आहे. आता खातेवाटपाचा वाद केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या कोर्टात गेल्याचे सांगितले जात आहे. यासाठी अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
सलग दोन रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठका झाल्या. मात्र, राष्ट्रवादीच्या मंत्रिपदाचा तिढा काही सुटायचे नाव घेत नाही. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांच्या शपथविधीला ९-१० दिवस उलटले असले तरी खातेवाटप काही केल्या होत नाही. यामुळे शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रात बैठकांवर बैठका घेऊनही तिढा सुटत नसल्याने अखेर अजित पवारांनी दिल्ली गाठण्याचे ठरविले आहे. यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दिल्लीला निघाले आहेत.
शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष
महायुतीत खातेवाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न होतोय. पण तिढा काही सुटता सुटत नाही. त्यामुळे आता तेट हा प्रश्न दिल्ली दरबारी जाण्याची शक्यता आहे. थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दरबारात हा प्रश्न मांडला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील दिल्लीत दाखल होणार आहेत. दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन खाते वाटपावर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, गृहखाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. महसूल खाते काढून राधाकृष्ण विखे पाटील यांची नाराजी ओढवून घेता येणार नाही. अर्थ खाते राष्ट्रवादीला देण्यास शिंदे गटाने विरोध दर्शविला आहे. यामुळे आता भाजपसमोर मोठे संकट उभे राहिल्याचे बोलले जात आहे. याशिवाय आणखी दोन ते तीन खात्यांवरून महायुतीत बेबनाव आहे. प्रमुख खाती न सोडण्याचा शिंदे गटाने निर्धार केला आहे. तर राष्ट्रवादीलाही महत्त्वाची खाती हवी आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत जाऊनच या खाते वाटपावर तोडगा काढला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने