ब्युरो टीम : सत्तारुढ भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात समन्वयासाठी अखेर एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांचे प्रत्येकी चार नेते या समितीत असतील. भाजपचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड हे समितीचे समन्वयक असतील.
तीन पक्षांमधील विसंवाद दूर करण्याचे काम ही समिती करेल. वादाचे विषय माध्यमांसमोर नेण्याऐवजी आधी या समितीत त्यांची चर्चा केली जाईल व नंतर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना त्याबाबतची माहिती दिली जाईल.
राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर दोन पक्षांचे काही मंत्री महामंडळांवरील नियुक्त्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी दोनवेळा एकत्र बसले होते; पण त्याला समितीचे स्वरूप नव्हते. मध्यंतरी एका जाहिरातीवरून भाजप-शिवसेनेत काहीसा तणाव निर्माण झाल्यानंतर समन्वय समिती स्थापन करण्याचे ठरले होते. शंभूराज देसाई यांनी तशी माहितीही माध्यमांना दिली होती. आता युतीमध्ये राष्ट्रवादी हा आणखी एक पक्ष सहभागी झाल्यानंतर तीन पक्षांची मिळून समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीत यांचा समावेश
समितीमध्ये भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे आणि खा. राहुल शेवाळे तर राष्ट्रवादीतर्फे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील व धनंजय मुंडे यांचा समावेश आहे.
समन्वय समितीच्या माध्यमातून राज्याच्या विकासकामांचा लेखाजोखा घेतला जाणार असून, तीनही पक्षांमध्ये निधी वाटपापासून ते महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात समन्वय समितीच्या माध्यमातून योग्य समन्वय साधला जाणार आहे. - आ. प्रसाद लाड, समितीचे समन्वयक
टिप्पणी पोस्ट करा