ब्युरो टीम :आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजपविरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळुरू येथे होणार आहे. या बैठकीला सुमारे २४ पक्ष हजेरी लावतील, असे म्हटले जात आहे.
मात्र, तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र काँग्रेसला टार्गेट दिल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 'इतक्या' जागा जिंका, असे सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदींनी राष्ट्रवादीवर ७० हजार कोटी घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यांच्याकडेच आता राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. भाजपला लोकशाही मान्य नाही. जनता उपाशी आणि राज्य सरकार तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
त्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकून आणू
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रासाठी टार्गेट दिलेले असून ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. आम्हाला खरगे यांनी २१ लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे टार्गेट दिले आहे. त्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकून आणू, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत आहे. विरोधी पक्षात काँग्रेसचे जास्त आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल. राष्ट्रवादी मंत्रिमंडळात आहे. ९ आमदारांनी शपथ घेतली आहे. आता राष्ट्रवादीकडे ४४ आमदार आणि काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत. आमचे संख्याबळ जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेते पदही आम्हालाच मिळणार, असे नाना पटोले यांनी ठामपणे सांगितले. तसेच मोदी-फडणवीसांची हवा खराब झाली म्हणून अजित पवारांना आयात केल्याचा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला.
टिप्पणी पोस्ट करा