ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणार आहेत. या दिवशी मोदी प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतील; तसेच टिळक स्मारक येथे लोकमान्य टिळक यांना अभिवादन करतील.त्यानंतर शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मोदी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण केले जाते. यंदा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. मोदी यांनी हा पुरस्कार स्वीकारला असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्कार वितरणाचा तपशील किंवा पंतप्रधानांचा अधिकृत दौरा अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, पंतप्रधानांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून; तसेच जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिस दलाकडून या दौऱ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे महापालिका; तसेच पोलिस आयुक्त यांनी नुकतीच लोहगाव विमानतळ तसेच मोदी यांच्या शहरातील संभाव्य प्रवासमार्गाची पाहणी केली. त्याचबरोबर मोदी यांच्या दौऱ्याच्या नियोजनासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीही बैठक झाली. त्यात नेमके कोणकोणते कार्यक्रम घेता येतील, याची चाचपणी करण्यात आली.
या सर्व बैठकांमधून मोदी यांच्या सुमारे तीन ते चार तासांच्या पुणे दौऱ्याची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयातून वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी पुण्यात येऊन प्रत्यक्ष जागांची, व्यवस्थेची पाहणी करतील. त्यानंतरच अंतिम दौरा जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा