Pruthviraj chavhan : “गुरुजींना अटक करण्याची भाषा, माजी मुख्यमंत्र्याला जीवे मारण्याची धमकी



ब्युरो टीम : महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत', असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे

त्यांच्या या विधानावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.

संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “संभाजी भिडे नावाच्या गृहस्थाने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला कलम 153 अंतर्गत अटक केली पाहिजे. अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ते करत आहेत." असा आरोप त्यांनी केला आहे.

‘राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर हा माणूस बाहेर कसा फिरू शकतो. यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे? असे सवाल करत पुढे कलम 153 अंतर्गत या व्यक्तीला अटक केली पाहिजे.’ अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “गुरुजींना अटक करण्याची भाषा करता तुम्हाला जगायचे आहे का?’ अशा धमकीचा ई-मेल पृथ्वीराज चव्हाण यांना आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून कराड येथील त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नांदेडहून ईमेल आला असल्याचे सांगितले जात असून याबाबत खात्री करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर ई-मेल तपासणी करत असताना धमकीचा मेल आला असल्याचे त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना समजले. त्यांनी याबाबतची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्यानंतर त्यांनी ही बाब पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलीस माहिती घेत असून त्यांच्या कराड येथील पाटण कॉलनीतील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याचं देखील सांगितलं आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने