Radhakrushn vikhe patil : भंडारदरा व मुळा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना


ब्युरो टीम :भंडारदरा आणि मुळा धरणातून गोदावरी लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याच्या सूचना महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून भंडादारा, निळवंडे आणि मुळा धरणातील पाण्याची सद्यस्थिती जाणून घेतली. याप्रसंगी जलसंपदा विभागाच्या नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता महेश आमले, कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, नगर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, कैलास ठाकरे आदी अधिकारी उपस्थित होते.

पावसाचे प्रमाण अजूनही अत्यल्प असल्याने अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. बहुतांशी भागातील पाण्याची मागणी वाढत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेवून आवर्तन सोडण्याचे नियोजन विभागाने तातडीने करावे. असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण लक्षात घेवून हेच आवर्तन शेतीसाठी सुध्दा कायम करता येईल याबाबतही अधिकाऱ्यांनी प्राधान्याने विचार करावा असेही त्यांनी सूचित केले.

मुळा धरणातील पाणी साठयाचा आढावा बैठकीत घेवून आवर्तन सोडण्याबातही कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी दिल्या आहेत.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने