ब्युरो टीम : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांत नवीन पाण्याची आवक झपाट्याने होत आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 77 टक्के, निळवंडे जलाशयाचा पाणीसाठाही 37 टक्क्यांवर पोहोचला आहे.
यंदा भंडारदर्याला पावसाचे उशिरा वेध लागले. जून महिन्याच्या सरतेशेवटी पाऊस सुरू झाला. त्यानंतर शहरी भागात कमी पाऊस असला, तरी सह्याद्रीच्या पर्वतरांगांत चांगला कोसळत आहे. त्यामुळे निसर्ग सौंदर्य खुलले आहे. संततधार सुरू असल्याने ओल्या झालेल्या निसरड्या रानवाटा, चिंब भिजलेली जंगले, नागमोडी वळणे, खळखळत कोसळणारे धबधबे हा निसर्गाचा अविष्कार अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले आपसूकच आता भंडारदरा परिसराकडे वळू लागली आहेत. तसेच मुळा खोर्यातील कोथळे, शिरपुंजे हे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर बलठण तलावही ओव्हर फ्लो झाला आहे. मात्र, आढळा खोर्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, भंडारदरा धरण हे दरवर्षी 15 ऑगस्ट पूर्वी भरत असते. यंदा मात्र पाऊस उशिरा सुरू झाल्याने हे धरण 15 ऑगस्ट पूर्वी भरणार का? याबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र सध्या धरणातील पाणीसाठा 77 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही हे धरण 15 ऑगस्ट पूर्वी भरण्याची शक्यता वाढली आहे.
टिप्पणी पोस्ट करा