ब्युरो टीम : कर्जत- जामखेड मतदारसंघाच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेल्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळावी, यासाठी आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मौनव्रत आंदोलन केले.
कर्जत-जामखेडवर होणारा अन्याय थांबून तात्काळ एमआयडीसीला मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. या प्रश्नासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून शासन दरबारी रोहित पवार यांचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत वेळोवेळी त्यांनी उद्योगमंत्री, मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना याबाबत निवेदनही दिले होते. परंतु, शासनाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर आपण मंजुरी न मिळाल्यास आंदोलन करू, असा इशारा सरकारला दिल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशनात एमआयडीसीचा मुद्दा मार्गी लावू, असे आश्वासन दिले. त्यावेळी रोहित पवार यांनी आपले उपोषण स्थगित केले होते. मात्र, पावसाळी अधिवेशन सुरू होऊन आठवडा उलटून गेला तरीही अद्याप यावर कोणत्याही चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता अखेर आमदार रोहित पवार हे स्वतः विधानभवन परिसरात आज सकाळपासूनच आंदोलनाला बसले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली महत्वाची मागणी
दरम्यान, कर्जत-जामखेड एमआयडीसी प्रश्नासाठी रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही साकडे घातले आहे. याबाबत ट्विट करीत रोहित पवार यांनी म्हंटले आहे की, 'मा. अजित पवार धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा विषय हा आजचा नाही, तर केवळ अधिसूचना काढून पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी वारंवार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटून विनंती केली, निवेदनं दिली, विधानसभेतही आवाज उठवला. परंतु राजकीय दबावाला बळी पडत सरकारने प्रत्येक वेळी माझी आश्वासनावर बोळवण केली. त्यामुळं नाईलाजाने उपोषणाला बसण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझी आपणास विनंती आहे की, उपमुख्यमंत्री म्हणून आपणच याकामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला तर माझा संपूर्ण मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील!'
पहा व्हिडिओ:
टिप्पणी पोस्ट करा