Rohit Pawar : विरोधकांना ‘सावत्रभावाची’ वागणूक देण्याचा प्रकारअत्यंत निंदणीय, रोहित पवारांचा घणाघात



विक्रम बनकर, नगर : कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीच्या प्रश्नी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज बैठक न घेतल्याने  आमदार रोहित पवार पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. यापुढे या प्रश्नी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देतानाच, विरोधकांना ‘सावत्रभावाची’ वागणूक देण्याचा हा प्रकार अत्यंत निंदणीय आहे, असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच कर्जत जामखेडच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी काल, सोमवारी विधानसभेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून भर पावसात आंदोलन केले होते. 'कर्जत जामखेडमध्ये रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून एमआयडीसी आवश्यक आहे,' अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली.  यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर रोहित पवार यांनी उपोषण मागं घेतलं होतं. मात्र, उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आज बैठक झाली नसल्यानं रोहित पवार आक्रमक झालेत. तसेच त्यांनी ट्विट करीत राज्य सरकारवर निशाणा साधतानाच पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की,'माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना काढण्याबाबत आज (मंगळवार) दुपारी २.३० वाजता बैठक घेण्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांनी दिल्यामुळं काल उपोषण मागे घेतलं. त्यानुसार मी आणि सर्व अधिकाऱ्यांनी तब्बल साडेचार तास वाट पाहूनही उद्योगमंत्री बैठकीला आले नाहीत. त्यामुळं माझी तर फसवणूक झालीच पण माझ्या मतदारसंघाचीही फसवणूक करून संपूर्ण राज्यातील युवांविषयीचा दृष्टिकोन या सरकारने आपल्या कृतीतून दाखवून दिला. विरोधकांना ‘सावत्रभावाची’ वागणूक देण्याचा हा अत्यंत निंदणीय प्रकार आहे. तरीही माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, एमआयडीसीची अधिसूचना तातडीने काढून माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय द्या, अन्यथा माझ्या मतदारसंघातील युवांच्या आणि नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता याच अधिवेशनात पुन्हा तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने