ब्युरो टीम: भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कुलदीप यादव ( ४-६) व रवींद्र जडेजा ( ३-३७) यांच्या अप्रतिम गोलंदाजीनंतर इशान किशनच्या ( ५२) अर्धशतकाच्या जोरावर भारताने २२.५ षटकांत ५ विकेट्स राखून विजय मिळवला.
रोहित शर्मा व विराट कोहली यांनी आज फलंदाजीला नेहमीच्या क्रमांकावर न येता युवा खेळाडूंना संधी दिली. १२ वर्षांनंतर रोहित शर्मा वन डे क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यामुळे सामन्यानंतर मला माझे पदार्पण आठवल्याची कबुली रोहितने दिली.
रवींद्र जडेजा व कुलदीप यादव यांनी विंडीजचा संपूर्ण संघ ११४ धावांत तंबूत पाठवला. हार्दिक पांड्या, मुकेश कुमार व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रवींद्रने ७ चेंडूंच्या फरकाने विंडीजच्या ३ फलंदाजांना माघारी पाठवले. कुलदीपने ३ षटकांत ६ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. त्याने २ षटकं निर्धाव टाकली. ११५ धावांचे माफक लक्ष्य असताना रोहितने सलामीला न येण्याचा निर्णय घेतला. रोहितने आज इशान व शुबमन यांना सलामीला पाठवले. शुबमन ( ७), सूर्यकुमार यादव ( १९), हार्दिक पांड्या ( ५), शार्दूल ठाकूर ( १) हे आघाडीला येऊनही फार काही करू शकले नाही. इशानने ४६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. भारताने २२.५ षटकांत ५ बाद ११५ धावा करून मॅच जिंकली.
युवा खेळाडूंना संधी मिळण्यासाठी असे प्रयोग करत राहणार - रोहित
रोहित शर्मा म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगायचे तर, खेळपट्टी अशी असेल असे मला वाटले नव्हते. आमच्यासमोर मोठं आव्हान हवं असं आम्हाला वाटत होतं, कारण ही संघाची गरज होती. पण खेळपट्टी अशी खराब असेल असे कधीच वाटले नव्हते. आम्ही त्यांना इतक्या कमी धावांपर्यंत मर्यादित ठेवू असेही वाटले नाही. ( फलंदाजीच्या क्रमवारीबद्दल) आम्हाला मुलांना संधी द्यायची आहे. आम्ही पाच विकेट गमावू असे वाटले नव्हते, परंतु नुकत्याच आलेल्या अनेक खेळाडूंना संधी देण्याची ही एक चांगली संधी होती. मला वाटले की त्यांना ११५ पर्यंत मर्यादित ठेवल्याने आम्हाला कमांडिंग पोझिशनची गरज होती, म्हणून आम्हाला वाटले की आम्ही हा प्रयोग करू शकतो.
सातव्या क्रमांकावर शेवटचा कधी खेळला होतास, या प्रश्नावर रोहित हसला अन् म्हणाला, खरं तर ते माझं पदार्पण होतं! मुकेश हुशार आहे. कसोटीतही आम्ही पाहिले की तो नवीन चेंडू स्विंग करू शकतो, थोडा वेगवान आणि सातत्यपूर्णही आहे. त्यामुळे तो काय करतो हे बघायचे आहे. किशनने चांगली कामगिरी केली.
टिप्पणी पोस्ट करा