RSS Chief Mohan Bhagwat : देशात वाईट गोष्टींनाच जास्त प्रसिद्धी मिळते, मोहन भागवत



ब्युरो टीम : 'देशात जितक्या वाईट गोष्टींची चर्चा होते, त्यापेक्षा चाळीस पट अधिक चांगल्या गोष्टी घडत आहेत. याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन चांगला असायला हवा,’ असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ठाणे येथे बोलताना केले.

ठाणे महापालिका, जितो एज्युकेशनल अँड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या विद्यमाने ठाण्यातील बाळकुम परिसरात उभारण्यात येणाऱ्या ६०० खाटांच्या धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमिपूजन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी (३० जुलै) रोजी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी दादा भगवान फाउंडेशनचे दीपक देसाई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, टाटा कॅन्सर रुग्णालयाचे डॉ. शैलेश श्रीखंडे, ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर, जितो फाउंडेशनचे विश्वस्त अजय आशर आदी उपस्थित होते.

'देशात जे वाईट घडते त्याची चर्चा अधिक होते, परंतु देशात ४० पट अधिक चांगले काम सुरू आहे. मी हे फिरताना बघतो, पण ज्यांचे डोळे आणि कान उघडे आहेत, त्यांना ते दिसते. अनेक जण नि:स्वार्थ भावनेतून चांगले काम करीत आहेत. ठाण्यातील कर्करोग रुग्णालय हे त्यापैकीच एक काम आहे, असे सांगतानाच सरसंघचालक पुढे म्हणाले, '‘अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा जितक्या आवश्यक आहेत. कदाचित त्यापेक्षा अधिक आज सर्वसामान्यांना शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेची गरज आहे. नागरिक घरदार विकून मुलांना शिकवतात, आपले उपचार चांगल्या रुग्णालयात करतात. मात्र, या दोन्ही बाबींच्या सुविधा आपल्या देशात अपुऱ्या आहेत,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने