ब्युरो टीम : दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो, पण मुख्यमंत्री होण्याचा निर्णय हा येथे होत नाही, तर दिल्लीमध्ये होतो असे सांगत काँग्रेसचे विधीमंडळातील गटनेते आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी खोचक टोला लगावला.
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी येथील काँग्रेस भवनात पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. यावर प्रतिक्रिया देताना सतेज पाटील यांनी दिल्लीच्या मनात काय आहे यावर सर्व गोष्टी ठरतात, असा सल्लाही दिला.
पुढील निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार, आम्ही महायुतीबरोबर जाऊ शकत नाही. त्यात माझ्या बाबतीत कोणताही विषय नाही हे सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑफर दिली असली तरी मी महायुतीसोबत जाणे शक्यच नाही अशी ठाम भूमिका सतेज पाटील यांनी मांडली. राष्ट्रवादीत जरी फूट पडली तरी काँग्रेस एकसंघ आहे, राज्यात आणि देशातील अविश्वासाच्या राजकारणात सर्वसामान्यांना काँग्रेसच विश्वास देऊ शकतो असे ते म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा