ब्युरो टीम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-भाजप सत्तेबराेबर गेलेले राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी आज रविवारी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्याबराेबर राष्ट्रवादीचे नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात हा शपथविधी सुरू असतानाच राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. हा ‘ऑपरेशन लाेटस’चा भाग असल्याचे राष्ट्रवादी काॅंग्रेसने म्हटले आहे.
या शपथविधीला आमचा पाठिंबा नाही, असे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर अजित पवार यांचे हे बंड आहे, असे म्हटले जात आहे. जेवढे आमदार गेले, तेवढे 80 टक्के आमदार पुन्हा परत येणार असेही राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून सांगण्यात आले आहे. ज्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे, त्यांना देखील पाठिंबा नाही, असे स्पष्ट करण्यात आले. जे आमदार, अजित पवार यांच्याबराेबर गेले आहेत, ते सायंकाळपर्यंत येतील, असाही दावा राष्ट्रवादी काॅंग्रेसने केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकारी यांची बैठक सुरू झाली आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी देखील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या संपर्कात आहेत. अजित पवार यांच्या या बंडामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांचे बंड हे राष्ट्रवादीला परवडणारे नाही, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे अजित पवार यांचे हे बंड शमविण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस काय पाऊले उचलते आहे, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा