ब्युरो टीम : भारताच्या आभा खटुआने महिलांच्या गोळाफेकीत १८.०६ मीटर या राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी करताना आशियाई ॲथलेटिक्समध्ये रविवारी रौप्यपदक जिंकले. त्याचप्रमाणे लांब पल्ल्याची धावपटू पारुल चौधरीने पाच हजार मीटर शर्यतीत रौप्यपदकासह दुसरे पदक आपल्या नावे केले. या स्पर्धेत भारताने २७ पदकांसह तिसरे स्थान मिळवले.
शुक्रवारी तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या पारुलने पाच हजार मीटरमध्ये १५ मिनिटे ५२.३५ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. जपानच्या युमा यामामोटोने १५ मिनिटे ५१.१६ सेकंद वेळेसह सुवर्ण जिंकले. पारुलच्या नावावर पाच हजार मीटर स्पर्धेत १५ मिनिटे १०.३५ सेकंद अशा राष्ट्रीय विक्रमाची नोंद आहे. अंकिताने याच प्रकारात १६ मिनिटे ३.३३ सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले आहे. याआधी किशन कुमार आणि के. एम. चंदा यांनी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना पुरुष आणि महिला ८०० मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले. किशन एक मिनिट ४५.८८ सेकंद वेळेसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चंदाने महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत दोन मिनिटे १.५८ सेकंद वेळ नोंदवली. श्रीलंकेची एम. के. दिसानायका अव्वल क्रमांकावर राहिली. महिला आणि पुरुषांच्या २० किमी चालण्याच्या शर्यतीत अनुक्रमे प्रियंका गोस्वामीने रौप्य तर आणि विकास सिंहने कांस्यपदक जिंकले.
टिप्पणी पोस्ट करा