Sunil Gavaskar : विराट आणि रोहितच्या शतकांचा संघाला काय फायदा?; सुनील गावसकर कडाडले!



ब्युरो टीम : वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका जिंकली असली तरी या दौऱ्यातील संघ निवडीवरून माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी काही कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत. तरुणांपेक्षा संघातील प्रस्थापित खेळाडूंनाच अधिक पसंती मिळत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध मारलेल्या शतकांचा भारतीय संघाला काय फायदा होणार आहे, असा थेट प्रश्न त्यांनी केला आहे.

जगातील कोणताही संघ सध्याचे सामने जिंकतानाच भविष्यातील रणनीतीवर काम करत असतो. गावसकर यांनी 'मिड-डे' मध्ये लिहिलेल्या लेखात याच गोष्टीकडं बोट दाखवलं आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध रोहित आणि विराटनं शतक ठोकलं हे खरं आहे, पण त्यांच्या ऐवजी आपण तरुण खेळाडूंना संधी दिली असती. नवोदित खेळाडू कसोटी क्रिकेटशी कसं जुळवून घेतात याचा अंदाज घेतला असता तर अधिक चांगलं झालं असतं. मात्र निवड समिती कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही हेच दिसतंय. आपण दृष्टिकोन बदलला नाही तर पुन्हा मागचे दिवस पाहावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अजित आगरकरकडून आशा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) अलीकडंच अजित आगरकर यांची निवड समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. आगरकरच्या निवडीमुळं भविष्यात बऱ्याच गोष्टी बदलतील, असा आशावाद गावसकर यांनी व्यक्त केला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवसाचा खेळ पावसामुळं सुरू होऊ शकला नाही. त्यामुळं सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. पहिला सामना भारतानं जिंकल्यामुळं मालिका विजयाची माळही आपसूक भारताच्या गळ्यात पडली. आता २७ जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका होणार आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने