ब्युरो टीम : भारताला एक डावखुरा सलामीवीर मिळाला आहे. अवघ्या 21 वर्षाच्या यशस्वी जैसवालने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतकी खेळी करत कसोटी संघातील आपली दावेदारी अजून मजबूत केली.
यशस्वी जैसवाल आता भारताकडून कसोटीत पदार्पणातच शतकी खेळी करणारा तिसरा सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी आपल्या पदार्पणाच्या कसोटीतच शतकी खेळी केली होती.
शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पदार्पणातच 187 धावांची तडाखेबाज खेळी केली होती. तर पृथ्वी शॉने वेस्ट इंडीज विरूद्ध 134 धावांची नाबाद खेळी केली होती. मात्र या दोघांनीही आपले कसोटी पदार्पणातील शतक हे भारतात खेळताना ठोकले होते. मात्र यशस्वी जैसवालने आपले पदार्पणातील शतक हे परदेशात, वेस्ट इंडीजमध्ये ठोकले आहे.
यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात सावध फलंदाजी केली. त्यांनी आधी शतकी आणि त्यानंतर हीच भागीदारी दीडशतकाच्या पार नेली. या जोडीने दुसऱ्या सत्रात आपल्या धावांचा वेग वाढवला.
या दोघांची भागीदारी 160 धावांच्या पार गेल्यानंतर एक इतिहास रचला गेला. वेस्ट इंडीजमध्ये भारताकडून सर्वात मोठी सलामी भागीदारी रचण्याचा विक्रम रोहित आणि यशस्वीने आपल्या नावावर केला.
रोहित आणि यशस्वीने ही भागीदारी 200 च्या पार पोहचवले. रोहित - यशस्वी जोडीने अजून एक विक्रम पादाक्रांत केला. त्यांनी भारताकडून वेस्ट इंडीजविरूद्ध सर्वात मोठी सलामी भागीदारी रचणाऱ्या विरेंद्र सेहवाग आणि वसिम जाफर यांचा विक्रम मोडला. या दोघांनी 201 धावांची सलामी दिली होती.
टिप्पणी पोस्ट करा