Ajit pawar : आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवा ; भाजपच्या आहारी जाऊ नका : अजित पवार



ब्युरो टीम : शिंदे गटाप्रमाणे भाजपच्या विचारधारेच्या आहारी जाऊ नका. आपण सरकारमध्ये राज्याच्या विकासाच्या मुद्दयावर सामील झालो आहोत, त्यामुळे आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवा, असा कानमंत्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या गटाच्या आमदारांना दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि भाजपची विचारधारा सारखी आहे. त्यामुळे ते भाजपच्या सुरात सूर मिळवत आहेत. मात्र आपली आणि काँग्रेसची विचारधारा सारखी आहे. गेली २२ वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणारा मतदार आहे. त्यांची मते आपल्याला मिळाली पाहिजेत. भाजप आणि शिंदे गटाच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला पाठिंबा देणारी वक्तव्ये करू नका, असे अजित पवार यांनी आमदारांना सांगितले आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अजित पवार गटाचे आमदार मुंबईत होते. विधान भवनात आले. पण सभागृहात फिरकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूटच पडलेली नाही, अशा स्थितीत ते वावरत आहेत. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात संघर्ष सुरू आहे तसा संघर्ष करायचा नाही, अशी ताकीद आपल्या गटाच्या आमदारांना दिली आहे. मतदारसंघातील विकासकामांवर लक्ष केंद्रित करा, असे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.

अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी कुठेही भाजपच्या विचारधारेबाबत वक्तव्य केलेले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ठाण्यातील कार्यक्रमात अजित पवार यांना निमंत्रण होते. पण ते गैरहजर राहिले. तसेच संभाजी भिडे गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्यांचे मंत्री छगन भुजबळ यांनी तर भिडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने