Ajit pawar : आता लढा, सत्ता आल्यानंतर आम्ही आहोतच; अजित पवारांचा काँग्रेस नेत्यांना टोमणा

 


ब्युरो टीम : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर विधानसेभेत अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिदें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन प्रस्तावावर सभागृहात भाषण केले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अभिनंदन प्रस्तावावर भाष्य करत विजय वडेट्टीवार यांना शुभेच्छा दिल्या, तसेच यावेळी पवारांनी काँग्रेस नेत्यांना टोमणे मारले. अडचणीच्या काळातच वडेट्टीवारांकडे महत्वाची जबाबदारी दिली जाते. आता लढा, सत्ता आल्यानंतर आम्ही आहोतच, असा काँग्रेस नेत्यांची भूमिका दिसते, असा टोमणा त्यांनी मारला.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांना जशी खाती मिळाली, तशी वडेट्टीवारांना मिळेल अशी आशा होती. पण ती मिळाली नाहीत. त्यानंतर आपल्यात जे बोलणं झालं ते मी उघड करणार नाही. मी शब्दांचा पक्का आहे. पण, कुठंतरी मानसाला दु:ख, वेदना होतात. विरोधी पक्षनेतेपद द्यायचं म्हटलं तर दुसऱ्यांदा विजय वडेट्टीवारांचं नाव येतं. पण, अशोकराव चव्हाण मुख्यमंत्रीपद भूषवूनही ते पद घेत नाहीत. काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून बाळासाहेब हे पद घेतील असं वाटलं होतं पण त्यांनीही पद घेतलं नाही. जे लढायचं ते तुम्ही, नंतर चांगले दिवस आल्यानंतर आम्ही हायच, अशा पद्धतीचा काहींचा स्वभाव असतो, असा टोमणा अजित पवारांनी मारला.

अजित पवार पुढे म्हणाले की, 'यातील गमतीचा भाग सोडा. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मनावर घेऊ नये. टोमणे मारण्याचा माझा स्वभाव नाही. वडेट्टीवार जनतेच्या प्रश्नासाठी अनेकदा रस्त्यावर उतरले आहेत. वडेट्टीवारांनी आपली वैचारिक बैठक कायम ठेवली आहे त्याचं मी कौतुक करतो. विरोधी पक्षनेते पद महत्त्वाचं आहे. कमी कालावधीसाठी तुम्हाला हे पद सांभाळावं लागणार आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते पदाचं काम योग्यरित्या पार पाडाल याची खात्री आहे. तुम्हाला पाच वर्षांसाठी विरोधी पक्षनेतेपदी बसायची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त करतोय.'

देवेंद्र फडणवीस यांनीही वडेट्टीवार यांना शुभेच्छा दिल्या. वडेट्टीवार आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडतील. वडेट्टीवारांचा आवाज मोठा आहे, त्यामुळे त्यांना माईकची गरज पडणार नाही. सुधिर मुनगंटिवार यांच्याप्रमाणेच त्यांचा आवाज आहे. वडेट्टीवार हे संवेदशील आणि जमिनीशी जोडले गेलेले नेते आहेत. त्यांच्या वडिलांकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला आहे. त्यांचे वडिल सरपंच होते. धडाडीचा आणि कडक निर्णय घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांचाच वारसा वडेट्टीवार यांच्याकडे आलाय, अस फडणवीस म्हणाले

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने