संघर्ष-सातत्य-संघटन@३६५

 


        आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतली त्याला एक वर्ष पूर्ण झालं. कसलेल्या सारथ्याप्रमाणे त्यांनी सूत्र सांभाळली आणि भारतीय जनता पार्टीचा रथ चौखूर दौडेल याकडे २४x७ लक्ष दिला. पक्षविस्तारासाठी त्यांनी पायाला अक्षरशः भिंगरी बांधली. कठीण परिस्थितीशी संघर्ष, कामात प्रचंड सातत्य आणि केवळ संघटनशरणता, अन्यथा रात्रंदिन विजयासाठीच युद्ध म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिरूप! न खाउंगा न खाने दुन्गा म्हंटल्यावर ज्याप्रमाणे मोदीजींची प्रतिमा समोर येते, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हंटल्यावर "न सोउंगा न सोने दुन्गा" हीच प्रतिमा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनावर मागील वर्षभरात चांगलीच बिंबलेली आहे.

    प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी केलेला पूर्ण महाराष्ट्राचा तो झंजावाती दौरा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. हजारो कार्यकर्त्यांशी त्यांनी थेट संवाद साधला, कित्येकांशी व्यक्तीश: चर्चा केली, थेट त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जाग्यावरच त्यावर मार्ग काढला. कडक आवाजाच्या, दुरून काहीसे उग्र भासणाऱ्या या नेत्याचे संवेदनशील रूप या वर्षभरात अनेकांना जाणवलं... भावलं! कोणत्याही कार्यकर्त्यांशी थेट संपर्क राखणारे, तळागाळातील कार्यकर्त्यानी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत त्याचे आवर्जून कौतुक करणारे, कितीही व्यस्त कार्यक्रम असला तरीही कार्यकर्त्यांच्या व्हाट्सवरच्या प्रत्येक मेसेजची शंभर टक्के दखल घेणारे आणि नवनवे उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन देणारे हे नेतृत्व कार्यकर्त्यांना मनोमन भावलं. प्रेमाच्या आणि विश्वासाच्या या नात्याने संघटनेचे बंध अधिकच मजबूत विणले गेले, कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जाणीवपूर्वक जपला जाऊ लागला, एका फोनवर कार्यकर्त्यांची कामे मार्गी लागायला लागली आणि संघटना झपाट्याने वाढायला लागली.

    सुरुवातीला त्यांना फारसे गंभीरपणे न घेणाऱ्या विरोधकांना ही चिज काय आहे, हे जरा उशिरानेच कळले. एकीकडे या चुंबकाने कार्यकर्त्यांना पार्टीकडे आकर्षून घेतले. दुसरीकडे विधीमंडळ पक्षाच्या नेतृत्वाशी सुस्वर राखले. संघटना आणि सरकार ही एकाच रथाची दोन चाकं असली तरी सत्ता असताना ती एकत्रित चाललीत असं दृष्य पाहायला मिळणं हे सहसा दुर्मिळच असतं. अशा सुप्त संघर्षात अनेकवेळा पक्षाची फरफट झालेलीच अनेकदा दिसून आलेली आहे. पण दिलखुलास चंद्रशेखर  बावनकुळेंनी संघटनेचे सरकारशी नाते आणि सूर फारच सुंदर, अकृत्रिम अन निरोगी राखले. सरकारच्या योजना पक्षाने जनतेपर्यंत पोहोचवायच्या आणि पक्षाला सरकारने पाठबळ द्यायचे हे सूत्र या काळात अगदी घट्ट आणि वेगवान झाले. सरकार म्हणून देवेंद्रजींनी अख्खा महाराष्ट्र आपल्या धाडसी आक्रमक निर्णयाने ढवळून काढला आणि त्याच मंथनकाळात संघटना पाय रोवून घट्ट उभी ठेवण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी सक्षमपणे सांभाळली, जी त्या काळाची मोठी गरज होती. त्यातूनच देशाची अमृत काळाची वाटचाल नियोजनबद्ध आणि सुकर झाली. संघाच्या मुशीतले संस्कार, संघटनेतून मेहनतपूर्वक वर आल्याने अनुभवांची शिदोरी आणि पक्षाची विचारधारा शिरोधार्ह मानणारी शिस्त याच्या जोरावर संघटनेची वाटचाल त्यांनी आज यशस्वीपणे @३६५ केलेली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक आज सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही ज्या आत्मीयतेने आहे, तितक्याच प्रांजळ प्रेमाने ते पार्टीच्या सर्व नेतृत्वांनाही आहे, आणि त्याहूनही अधिक म्हणजे त्यांच्या वाटचालीची दहशत आज दूर उभ्या राहिलेल्या विरोधकांना त्याहून अधिक आहे. कधी जनतेच्या घरवापसीचा मेळावा भाजपाच्या प्रदेश कार्यालयात भरेल आणि आपला दरबार ओस पडेल या भीतीने धास्तावलेल्या विरोधकांच्या चेहऱ्यावरचं भेदरलेलं प्रश्नचिन्ह हीच आपल्याला प्रदेशाध्यक्षांच्या कार्याची, त्यातल्या यशाची खरी पोचपावती आहे

    संवेदनशील मनाचे हे नेतृत्व जिथे संघटनेचे काम असेल तिथे मात्र नेहमीच कर्तव्यकठोर असते. इथे काम करू इच्छिणाऱ्या लोकांना संधी दिली जाते, पदे दिली जातात, पण त्या जबाबदारीचा आढावाही काटेकोरपणे घेतला जाणार हे ही निश्चित असते. म्हणूनच महासंपर्क अभियान, हर घर तिरंगा, लाभार्थी संपर्क, बूथ यंत्रणा सक्षमीकरण, मोदी सरकारची नऊ वर्षे, केंद्र व राज्याच्या विविध योजना, मतदार नोंदणी, महाविजय २०२४, मेरी माटी मेरा देश, टिफिन बैठक, सेवा उपक्रम अशा  विविध लोकाभिमुख अभियानांची न संपणारी यादी होईल, जी या वर्षभरातच वास्तवात उतरवण्याचे शिवधनुष्य बावनकुळेंनी यशस्वीपणे उचलले. भाजप राज्याच्या कानाकोपऱ्यात सर्वसामान्य नागरिकांच्या मनात रुजवण्याचे काम या वर्षभरात अतिशय मेहनतपूर्वक व प्रामाणिकपणे या महाराष्ट्रात झाले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. यह तो सिर्फ झाकी है. येणाऱ्या काळातील आव्हाने जेवढी मोठी आहेत, या नेतृत्वाचे क्षितिजही त्याच क्षमतेने विस्तारत जाईल. भारतीय जनता पार्टी ज्यावेळी संसदेत दोन खासदार ते तीनशे दोन खासदार अशी गरुडझेप घेते, त्यावेळी तो सहज घडलेला चमत्कार नक्कीच नसतो. त्यामागे असते ती अनेक कर्मयोग्यांची अखंड साधना! महाराष्ट्राचे असेच एक कठोर कर्मयोगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ३६५ दिवसांच्या कर्तव्यसाधनेचे एक छोटेखानी आवर्तन आज पूर्ण झाले आहे. नजिकचे ध्येय हे निश्चितपणे भाजपा महाविजय-२०२४ हेच असणार आहे. त्यांच्या कठोर सातत्यपूर्ण, संघर्षशील संघटनसाधनेला येणारा काळ प्रसन्नतापूर्वक "तथास्तु" म्हणेल या पूर्ण विश्वासासह भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेशाध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! जयविजयी भव! दिग्विजयी भव!!

- अविनाश पराडकर, (प्रवक्ता, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने