Chagan bhujbal : सर्वांनी आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडावीत: मंत्री छगन भुजबळ

 


ब्युरो टीम : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित महसूल दिनाच्या औचित्याने महसूल सप्ताहाचे उद्घाटन पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे (नाशिक), माया पाटोळे (मालेगाव) यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महसूल विभाग हा राज्य शासनाचा अतिशय महत्वाचा विभाग असल्याने अधिकारी व कर्मचारी यांनी आपली कर्तव्ये अधिक जबाबदारीने पार पाडावीत, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

पृथ्वी ही श्रमिकांच्या खांद्यावर उभी आहे, असे तत्वज्ञान सांगणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून मंत्री छगन भुजबळ म्हणाले, प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांच्या कामावर शासनाचे कर्तृत्व अवलंबून आहे. महसूल विभाग हा राज्य शासनाचे नाक, कान व डोळे अशी महत्वाची भूमिका बजावित असल्याने सर्वांनी जनतेसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्याच्या भावनेतून काम करावे. तसेच येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमा दरम्यान नाशिक तहसिल कार्यालयास एक व्हि.सी. यंत्रणा व संजय गांधी निराधार शाखेस संगणक संच यावेळी देण्यात आला. तसेच जिल्ह्यात ई शिधापत्रिका देण्याचे सुनिश्चित झाले असल्याने मान्यवरांच्या हस्ते समीर सुभाष हिंगणे, संदिप तुकाराम कांडरकर, विजय संभाजी चव्हाण, अभिषेक कैलास सातळे, स्वाती जयंत घोडके यांना प्रातिनिधीक स्वरूपात ई शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन निधीतून जिल्ह्यातील 12 तहसिल कार्यालयांसाठी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गेल्या वर्षभरात महसूल विभागाने केलेल्या कामांची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नाशिकचे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी तर उपस्थितांचे आभार मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने