Chandrayaan 3: भारताचा 'विक्रम', इस्रोची 'जगात भारी' कामगिरी; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फडकला 'तिरंगा'

 

ब्युरो टीम:भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर आज सत्यात उतरला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चंद्रयान-३ ने आज मोठे यश मिळवले.

चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला.

२०१९ साली भारताच्या चंद्रयान-२ या मोहिमेत अंतिम क्षणी अपयश आल्याने इस्त्रोसह देशवासियांची निराशा झाली होती. मात्र या अपयशाने खचून न जाता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अधिक जोमाने प्रयत्न करत चंद्रयान-३ मोहिमेची आखणी केली होती.

दरम्यान, १४ जुलै २०२३ रोजी चंद्रयान-३ हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एकएक टप्पा पार करत हे या चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. अखेर आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागाच्या दिशेने झेप घेत चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरला. त्याबरोबरच एक नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे.

चंद्रयान-३ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसह इस्रोच्या संशोधकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याकडे पृथ्वीला आई तर चंद्राला मामा म्हटलं जातं. तर 'चंदामामा दूर के' हा वाकप्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र आता तो बदलून चंदामामा टूक के असं म्हणावं लागेल, अशा शब्दात या यशाचा आनंद व्यक्त केला. तसेच पुढच्या काळात भारत गगनयान, आदित्य-१ या मोहिमांसह शुक्र ग्रहावरील मोहिमांचेही सुतोवाच केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने