ब्युरो टीम: केंद्र आणि राज्य शासनाच्या
संयुक्त विद्यमाने राज्यातील इतर मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी ‘मोदी आवास’
योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये सन २०२३ -२४ मध्ये नाशिक जिल्ह्यात सुमारे ३५
हजार घरकुल निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. यातून इतर मागास प्रवर्गातील
जास्तीत जास्त पात्र नागरिकांना लाभ मिळवून द्यावा अशा सूचना राज्याचे अन्न,
नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन
भुजबळ यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल
यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
केंद्र आणि राज्य
शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील इतर मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी
राज्यात ‘मोदी आवास’ योजना राबविण्यात येत असून यासाठी १२ हजार कोटी रुपयांचा निधी
खर्च केला जाणार असून प्रतिवर्ष ३ लाख घरे बांधण्यात येणार आहे. आज नाशिक येथील
कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक
संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा
आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल,
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प
संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील इतर
मागास प्रवर्गातील याद्यांची पडताळणी करून याद्या अद्ययावत करून पात्र नागरिकांना
घरकुलांचा लाभ मिळवून देण्यात यावा अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
टिप्पणी पोस्ट करा