Cinemetograph bill : चित्रपट पायरसीविरोधात सरकारचे मोठे पाऊल; संसदेत सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक 2023 मंजूर

 


ब्युरो टीम : सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, 2023 ला लोकसभेने मंजुरी दिल्याने या विधेयकाला संसदेत मंजूरी मिळाली आहे. 20 जुलै 2023 रोजी राज्यसभेमध्ये हे विधेयक मांडण्यात आले होते आणि त्यावर चर्चा झाल्यानंतर 27 जुलै 2023 रोजी ते मंजूर करण्यात आले.

वर्ष 1984 मध्ये म्हणजे 40 वर्षांपूर्वी सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 मध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या कायद्यात आणखी सुधारणा घडवत संसदेने हे ऐतिहासिक विधेयक मंजूर केले आहे.

विशिष्ट अंदाजांच्या आधारे असे आढळून आले आहे की पायरसी, चित्रपट उद्योगाच्या 20,000 कोटींच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे पायरसीला व्यापक प्रमाणात आळा घालण्याच्या उद्देशाने हे सुधारित विधेयक मांडण्यात आले होते.

किमान 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि 3 लाख रुपयांचा दंड अशी कडक शिक्षा देण्यात आली असून ही शिक्षा 3 वर्षांचा तुरुंगवास आणि लेखापरीक्षणानुसार चित्रपट निर्मिती खर्चाच्या 5% रकमेइतका दंड अशी वाढवता येण्याची तरतूद यामध्ये आहे.

लोकसभेत सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, 2023 चर्चा आणि मंजुरीसाठी सादर करण्यात आले तेव्हा या विधेयकाबद्दल बोलताना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, "भारत हा आपली समृद्ध संस्कृती, वारसा, वडिलोपार्जित परंपरा आणि वैविध्य यांचे दर्शन घडविणाऱ्या कथा सांगणाऱ्यांचा देश आहे. येत्या 3 वर्षांत आपला चित्रपट उद्योग 100 अब्ज डॉलर्सपर्यंत भरारी घेणार असून त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही पायरसीशी लढण्यासाठी आणि चित्रपट उद्योगाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी हे विधेयक आणले आहे.या सुधारणा चित्रपट उद्योगाचे 20,000 कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या पायरसीच्या त्रासाला व्यापक प्रमाणात आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत."

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, "चित्रपटाच्या परवान्याचे नूतनीकरण दर 10 वर्षांनी केले जाण्याची अट सरकारने काढून टाकली असून आता हा परवाना आजीवन वैध करण्यात आला आहे. आता परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या घालण्याची गरज उरलेली नाही. के.एम.शंकराप्पा विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात देण्यात आलेल्या निर्णयाला अनुसरत सरकारने रिव्हिजन अधिकारापासून स्वतःला दूर ठेवत या बाबतीत संपूर्ण लक्ष देण्याचे अधिकार आता सीबीएफसी स्वायत्त संस्थेला देण्यात आले आहेत."

दरम्यान, भारतीय चित्रपट उद्योग हा जगातील सर्वात मोठा आणि जागतिकीकरण झालेल्या उद्योगांपैकी एक आहे. दरवर्षी 40 हून अधिक भाषांमध्ये 3,000 हून अधिक चित्रपटांची निर्मिती हा चित्रपट उद्योग करतो. चित्रपटाचे माध्यम, निगडीत साधने आणि तंत्रज्ञानात काळानुरूप महत्त्वाचे बदल झाले आहेत. इंटरनेट आणि समाज माध्यमांच्या आगमनामुळे पायरसीचा धोकाही अनेक पटींनी वाढला आहे. सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, 2023 हे आज संसदेने मंजूर केले असून ते पायरसीच्या धोक्याला आळा घालण्यासाठी आणि व्यवसाय करण्याच्या सुलभतेसह भारतीय चित्रपट उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी खूप मदत करेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने