ब्युरो टीम: तब्बल एका तपानंतर (12 वर्षे) पुन्हा एकदा आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेटवेडय़ा हिंदुस्थानात होत आहे. 5 ऑक्टोबरपासून या स्पर्धेची 'रन'धुमाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल 18 देशांची भ्रमंती करून बुधवारी सकाळी 7.30 वाजता वर्ल्ड कपची झळाळती ट्रॉफी आग्र्यातील ताजमहल येथे पोहोचली.
उपस्थित पर्यटकांना अनपेक्षितपणे ही ट्रॉफी 'याचि देही याचि डोळा' बघायला मिळाल्याने सेल्फी आणि व्हिडीओ काढण्यासाठी येथे चाहत्यांची एकच झुंबड उडाली.
अंतराळात झाले होते ट्रॉफीचे अनावरण
दोन महिन्यांपूर्वी अंतराळात आयसीसी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले होते. आयसीसीने अमेरिकेतील 'सेंट इंटु स्पेस' या एका खासगी अंतराळ संस्थेच्या मदतीने ट्रॉफी बलूनमधून अंतराळात पाठवली. पृथ्वीपासून तब्बल 12 हजार फूट उंचीवर आकाशात या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ही ट्रॉफी उतरविण्यात आली. त्यानंतर ही ट्रॉफी जगाच्या भ्रमंतीवर निघाली.
देशातील विविध शहरांत फिरणार ट्रॉफी
27 जूनपासून जगाच्या भ्रमंतीवर निघालेली आयसीसी वर्ल्ड कपची ट्रॉफी तब्बल 18 देशांची भ्रमंती करून हिंदुस्थानात परतली. आता देशातील विविध शहरांमधील प्रवासावर ही ट्रॉफी निघणार आहे. मायदेशातील ट्रॉफीच्या या प्रवासाची सांगता 4 सप्टेंबरला होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा