ब्युरो टीम : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा जपानमधील कोयासन विद्यापीठाने केली आहे.
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले.
कोयासन विद्यापीठाचे अधिष्ठाता सोएदा सॅन यांनी ही घोषणा केली. आगामी भारत भेटीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करण्यात येईल.
जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरुन फडणवीस हे सध्या तेथे पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पहिल्याच दिवशी टोकियोतील इंडिया हाऊसमध्ये फडणवीस यांनी विविध मान्यवरांशी चर्चा केली. त्यात अधिकाधिक जपानी कंपन्यांना महाराष्ट्रात आणणे, मराठी विद्यार्थ्यांना जपानमध्ये अधिक शैक्षणिक संधी आणि जपानमधील मराठी उद्योजकांच्या विकासासाठी पाऊले उचलणे, इत्यादी बाबतीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा