Health : आता उपचार झाला सोपा ; पांढऱ्या कार्डावरही फ्री उपचार, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश

 


ब्युरो टीम : पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांनाच यापूर्वी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येत होता. चारच दिवसांपूर्वी शासनाने राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांना योजनेत समाविष्ट केल्याने राज्यातील २२ लाख ४१ हजार ६११ तर सांगली जिल्ह्यातील ७९ हजार ३१८ शुभ्र कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अशा कार्डधारक कुटुंबांना प्रतिवर्षी ५ लाखापर्यंतचे आरोग्य संरक्षण कवच लाभणार आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांना मोठा लाभ मिळत आहे. १ हजार ३५६ उपचार या योजनेअंतर्गत मोफत करण्यात येतात. यापूर्वी केवळ पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांसाठी ही योजना होती. राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांचा समावेश याेजनेत करावा, अशी मागणी केली जात होती. शासनाने २८ जुलै २०२३ रोजी याबाबतचा निर्णय घेऊन शुभ्र कार्डधारकांना दिलासा दिला आहे.

३२८ नव्या उपचारांचा समावेश

योजनेत मागणी नसलेले १८१ उपचार वगळले असून ३२८ मागणी असलेल्या नवीन उपचारांचा समावेश केला आहे. आता योजनेतील उपचार संख्या १,३५६ एवढी करण्यात आली आहे.

५ लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण

याेजनेत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष रु. १.५ लाख एवढे होते. आता प्रती कुटुंब प्रती वर्ष ते पाच लाख एवढे करण्यात आले आहे. मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी असलेली अडीच लाख खर्चाची मर्यादा वाढवून साडेचार लाख केली आहे.

कधी होणार अंमलबजावणी?

राज्य शासनाने हा निर्णय घेतला असला तरी त्याच्या अंमलबजावणीस अद्याप दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. आरोग्य हमी सोसायटी रचना, विमा कंपनीशी करार या गोष्टींची तयारी शासनस्तरावर सुरू आहे.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने