ब्युरो टीम: आगामी वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानच्या संभाव्य संघात दहा खेळाडू जवळजवळ निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता केवळ पाच स्थानांसाठी किमान 20 नव्या दमाच्या खेळाडूंमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाला आहे.
तो संघर्ष अधिक तीव्र करण्यासाठी शुक्रवारपासून आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरू होतेय. या मालिकेतील कामगिरीवर जोरावर यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार यासारख्या खेळाडूंवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुखापतीमुळे गेले 11 महिने संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमरा नेतृत्वाच्या जबाबदारीसह गोलंदाजीची धुरा वाहण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. बुमराच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानी गोलंदाजीची धार अधिक बोथट झाली होती, मात्र आता त्याच्या समावेशामुळे हिंदुस्थानी गोलंदाजीला पुन्हा ती धार मिळवून देण्यात किती यशस्वी ठरतो, ते या मालिकेतूनच कळू शकेल. आशिया कपपूर्वी स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी बुमराला आपली सर्वोत्तम गोलंदाजी करावी लागणार आहे. ही मालिका त्याच्या फिटनेसची कसोटीही ठरणार आहे.
विंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत धडाकेबाज कामगिरी कराऱया तिलक वर्माच्या फलंदाजीकडे सर्वांच्या नजरा आपसूकच लागल्या आहेत. या मालिकेतही त्याची कामगिरी दमदार झाली तर आगामी आशिया कपसाठीही त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. तसेच यशस्वी जैसवाल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमारलाही लक्षवेधी कामगिरी वन डेसाठी आपल्या नावाचा विचार करायला भाग पाडू शकतात. या मालिकेतील जोरदार आणि धडाकेबाज कामगिरी यशस्वी खेळाडूसाठी आशिया कपच नव्हे तर आगामी वर्ल्ड कपचेही प्रवेशद्वार ठरू शकते. तसेही हिंदुस्थानी संघात तीन-चार नवी नावेही दिसू शकतात.
जसप्रीत बुमरा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी विष्णोई, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अॅण्ड्रय़ू बालबर्नी, मार्क अडायर, कर्टिस पॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, जोश लिटिल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टॅक्टर, लॉरकन टकर, थियो वॅन वॉरकॉम, व्रेग यंग.
हिंदुस्थान विरुद्ध आयर्लंड
द विलेज, डब्लीन, सायं - 18.30
कुठे पाहाल - स्पोर्ट्स 18, स्पोर्ट्स 18 खेल, जियो टीव्ही
टिप्पणी पोस्ट करा