Jagdish dhankad : अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवेदनाचा उल्लेख करत विरोधकांचे धनकड यांना चोख प्रत्युत्तर

 


ब्युरो टीम : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. पंतप्रधानांनी या मुद्द्यावर निवेदन देण्याची विरोधकांची मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहात निवेदन दिल्याशिवाय मणिपूरवर चर्चा होऊ न देण्याच्या विरोधी पक्षांच्या भूमिकेवर राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांनी तीव्र शब्दांत ताशेरे ओढले

त्याला विरोधकांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे उदाहरण देत चोख प्रत्युत्तर दिले आहे.

माकपचे विद्यमान महासचिव व राज्यसभेचे तत्कालीन सदस्य सीताराम येचुरी यांनीही 2014 मध्ये पंतप्रधानांनी सभागृहात येऊन निवेदन देण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळीही तत्कालीन सभापतींनी ही मागणी फेटाळली होती, असे उदाहरण देत धनखड यांनी आत्ता विरोधकांची मागणी गैरलागू असल्याचे स्पष्ट केले. मात्र, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजयेपी यांनी सभागृहात केलेल्या निवेदनाचे उदाहरण देत काँग्रेसने धनखड यांच्या टिकेला तितकेच तीव्र प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे राज्यसभेतील मुख्य प्रतोद व माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी धनखडांचे नाव न घेता ट्वीटद्वारे प्रहार केला.

6 मे 2002 मध्ये राज्यसभेत काँग्रेसचे तत्कालीन सदस्य अर्जुन सिंह यांनी गुजरातमधील हिंसाचारावर चर्चेचा प्रस्ताव देऊन पंतप्रधान वाजपेयींच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती. दुपारी 12.04 वाजता विरोधी पक्षनेते मनमोहन सिंग यांनी मुद्दे मांडले. 12.26 वाजता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रस्तावावर मत मांडले. 12.56 वाजता गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी बोलले. दुपारी 1.35 वाजता अर्जुन सिंह यांनी प्रस्तावाला उत्तर दिले. दुपारी 2.25 वाजता प्रस्ताव स्वीकारण्यात आला. ही माहिती ट्वीट करून काँग्रेसने अचूक उल्लेख करत धनकड यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ऑगस्ट 2000 मध्ये पाकिस्तानच्या मुद्दय़ावर, ऑगस्ट 2001 मध्ये यूटीआय घोटाळय़ावर, 2003 मध्ये इराकच्या मुद्दय़ावर विरोधकांनी तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींच्या सभागृहात निवेदनाची मागणी केली होती. ही मागणी मान्य करून वाजपेयींनी निवेदन दिले असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली.

राज्यसभेत शून्य प्रहारात विरोधकांनी गोंधळ घातला व प्रश्नोत्तराच्या तासाला सभात्याग केला. विरोधकांच्या या कृतीवरही धनखड यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी तारांकित प्रश्न विचारले आहेत पण, ते सभागृहात उपस्थित नाहीत. हा तास म्हणजे लोकशाहीचे हृदय मानले जाते. पण, विरोधक त्याचा मानही ठेवायला तयार नाहीत, असे ताशेरे धनखड यांनी ओढले. लोकांच्या पैशाचा विरोधक अपव्यय करत असून त्यांच्या या वर्तनाबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी देशातील बुद्धिजिवी वर्ग, प्रभावशाली व्यक्तींशी चर्चा करावी व जनमत तयार करावे, अशी सूचनाही धनखड यांनी केली. मात्र, काँग्रेसने अटलबिहारी वाजपेयी यांचे अचूक उदाहरण देत धनकड यांना चांगलेच प्रतुत्तर दिले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने