ब्युरो टीम: राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील दोन गट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्यभरात दौरे, सभा सुरू केल्या आहेत. अलीकडेच बीडमध्ये शरद पवारांची सभा झाली. या सभेला तुफान गर्दी होती, असे सांगितले जाते.
बीडनंतर आता शरद पवार यांची कोल्हापूरला सभा होणार आहे. कोल्हापूरनंतर जळगाव आणि पुण्यात सभा होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. याबाबत बोलताना, कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तो राष्ट्रवादीनेच लढावा अशी आमची इच्छा आहे. तसेच अजित पवार आणि माझ्यात कोणतेच वाद नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
शरद पवार नेहमीच पुरगोमी विचारांचे राहिले आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्रात जपणे आवश्यक आहे. जनतेमध्ये समतेचा संदेश देणे गरजेचे आहे. शरद पवार ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहेत. हा गैरसमज काही जण पसरवत आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक खूप लांब आहे. पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. त्याविरोधात जनता आहे आणि जनतेपर्यंत जाऊन शरद पवार आपली भूमिका मांडत आहेत. शरद पवार साहेब यांच्याबद्दल हसन मुश्रीफ यांना आदर आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय का घेतला हे तेच सांगतील. कोल्हापूरच्या सभेत याची उत्तरे मिळतील. महाविकास आघाडीच्या सभा लवकर सुरु होतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
अजित पवार अन् माझ्यात कोणतेच वाद नाहीत
शरद पवार यांनी सोडून गेले ते आजही साहेबांना मानतात. ते आग्रहाने सांगतात की, ते माझा विठ्ठल आहे. जे गेले ते शरद पवार यांचा फोटो लावतात. त्यावर मी आक्षेप घेणे बरोबर नाही. शरद पवार राजकारणात त्यांना आणले नसते तर ते आजपर्यंत या ठिकाणी पोहोचले नसते. अजित पवार आणि माझ्यामध्ये कोणतेच वाद नाहीत. आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत त्यांच्यासोबत राहिलोय, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक बाहेर आले. त्यानंतर आम्ही काहीजणांनी जाऊन त्यांची भेट घेतली. मलिक यांना किडनीचा त्रास सुरु झाला आहे. विश्रांती घेण्यासाठी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. ते राजकीय विषय कोणाशीही बोलत नाहीत, त्यामुळे त्यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, त्यांच्यासंदर्भात राजकीय बोलून मी त्यांना अडचणीत आणणार नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा