Na.Dho. Manohar: !! हिरव्या बोलीचा शब्द अबोल झाला! रानं मुकाट झालेले! पक्षी पंखात मिटले तुझ्या वाटेला डोळे ओले! सुकून गेले पाणमळे!



अर्जुन देशमुख( पाथर्डी): लहानपणी शाळेत असताना..आणि फार काही उमजत नाही, समज नाही, अशा वयात रेडिओ वर 'आपली आवड 

या श्रोत्यांच्या मनपसंत कार्यक्रमात गीत ना. धों.महानोर यांचं असं ऐकून,

"किती जीवाला राखायचं राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं.." जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी.." चिंब पावसानं रानं, झालं आबादानी "..मी काट्यातून चालून थकले.."नभ उतरू आलं चिंब थरथरवलं..अशी गाणी शेतात, शिवारात ऐकताना..एकदम त्या अजाणत्या वयातही शब्दांचा अर्थ ही उमजत नव्हता तरी ते पुनःपुन्हा ऐकावसं वाटलच आणि आजही ते ताज टवटवीत उत्साही, उल्हासी असच वाटतं. आणि या गाण्यांनी कान भरभरून तृप्त होवून जायचा, 

हे रेडिओ वर सुरू असताना वडील म्हणायचे " हे गाणे पळसखेड्याच्या एका साध्या शेतकरी हुशार माणसाने लिहिलेले हे बरं का " आमदार होते ते"

आणि मनात ना. धों.महानोर या नावाची एक प्रतिमा आकारत गेली,

आणि "कसे असतील हे ना. धों.महानोर असं उगीच वाटायचं. 

एकोणीसशे ब्यन्नव, त्र्यान्नव, चौर्यान्नव, पंचान्नव अशा दरम्यान मी औरंगाबाद च्या यशवंत कला महाविद्यालयात चित्रकलेचं शिक्षण घेत असताना ना. धों.महानोर यांच्या संदर्भात मराठवाडा, लोकमत, तरूण भारत, अशा काही पेपरात सतत छापून यायचं, रेषा, रंग, आणि शब्द याचा एकमेकांशी कसा कलासंगम आहे हे समजत गेलं. अजिंठ्याला कला महोत्सवात चित्रकला, आणि साहित्य यांचा संगम व्हायचा ना. धों.महानोर मराठवाड्याचे सुपुत्र म्हणून त्या महोत्सवात ते सन्माननीय असायचे, परंतू मी कधी त्या महोत्सवात गेलो नाही! 

जसजशी मन, बुद्धी प्रगल्भता विकसित होत गेली तसं तसं ते व्यासंगी होत गेलं. 

आणि त्याच दरम्यान कधीतरी शब्दांची जुळवाजुळव मी करीत गेलो. लिहिता लिहिता होत राहीलो, ते किती योग्य, किती अयोग्य,आणि चुकीचं होतं ते काही कळत नव्हतं, वैचारिक देवाण घेवाण होते याची जाणीव होत गेली तसं लिहिण्यात बळ येत गेलं. 

चित्रकला, रेषा, रंग या सोबत शब्द आणि अभिव्यक्ती एकदम खूप काळजाचं होत गेलं. 

दरम्यान एकोणीसशे सत्त्यान्नवला अहमदनगर ला यशवंतराव गडाख यांनी सत्तरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलं ते लिहित्या लोकांना खूप काही देणारं ठरलं. 

कधीतरी जाणीव होतं गेली आपण कविता लिहू शकतो, नंतर लिहिता लिहिता शब्द अभिव्यक्ती चं प्रभावी माध्यम आहे हे प्रकर्षाने जाणवत गेलं. कुणाला बोलायचं,आपले विचार सांगायचे म्हणून पत्र लिहिणं मला गरजेचं अधिक वाटू लागलं. कवितेसह पत्रातून मनाचा वेध घेत स्नेह जुळतो, वैचारिक जडण घडण होते, 

अहमदनगर ला झालेल्या त्या सत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदा प्रत्यक्ष कवीवर्य पद्मश्री ना. धों.महानोर यांना पाहिलं, आणि साध्या पण स्वच्छ अशा पाणीदार रुबाबदार या प्रतिभासंपन्न व्यक्तीनं जणू साहित्य कला संदर्भात भुरळच घातली.

पाथर्डीत शशिकांत शिंदे नावाचा एक प्रतिभासंपन्न कलासक्त असा कवी ज्याच्या ठायी माणूसपण ओतप्रोत भरलेलं, त्यांची भेट केवळ कवितेमुळे झाली, ते पाथर्डीत तिलोक जैन विद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक विभागात शिक्षक होते, मला चांगलं लिहिता येतं, किंवा कविता कशी असावी? असं खूप चर्चा व्हायची. आणि कविते बरोबरच समकालीन कवी शब्द मित्र पत्र संवाद करणं याच बरोबरीने जेष्ठ कवींना कविता आणि पत्रातून भरभरून लिहित जाणं हे छान सवईचं झालं. कवीश्री ना. धों.महानोर यांना दादा म्हणतात हे ही शशिकांत शिंदे यांनी च सांगितलं! 

तरीही मी फारसं तपशीलवार आणि जाणिवेने आदरणीय ना. धों.महानोर महानोर यांचं समग्र साहित्य अजून तरी वाचलं नाही, भरपूर हवं ते वाचायला ग्रंथसंपदा लाभायला माझी प्रतिकूलता कारणीभूत ठरते, म्हणून तरीही जे जे पेपरात, दिवाळी अंक व इतरत्र वाचता आलं ते मी मन लावून जाणीवपूर्वक वाचून घेण्याचा प्रयत्न केला, 

त्यांची सुगंधी, तरल, तरतरीत, हिरवी,पोपटी, कोवळ्या देठांची, निळ्या जांभळ्या भरून आलेल्या आभाळाची गुलाबी केशरी क्षितिजाची शब्दकळा मला मोहवून टाकणारी वाटते. 


त्यांचं मला एकजणाने भेट म्हणून दिलेलं " रानातल्या कविता " हा एकमेव संग्रह माझ्याकडे असून, कवी शशिकांत शिंदे यांनी वही हा क्राऊन आकाराचा एक संग्रह आहे! 

त्यांचं साकेत प्रकाशनाने केलेलं " शरद पवार आणि मी " हे पुस्तक खूप आवडलं ते संग्रही असावं असं आहे, दोनेक वेळा मी ते वाचलय, त्यातून खूप काही उकलत जातं, 

त्यांचे पाणझड, पावसाळी कविता, पक्षांचे लक्ष थवे, गपसप, गांधारी कादंबरी, प्रार्थना दयाघना असं आणखी असलेलं त्यांची पुस्तके अद्याप मी वाचलेली नाहीत, 

एक मात्र नक्की मला त्यांची गाणी खूप आवडली, जैत रे जैत, सर्जा, मधील हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली, स्वर्गीय लता मंगेशकर, रविंद्र साठे, आशा भोसले, जयश्री शिवराम वगैरे गायक गायिकांनी सुरेल कंठाने गायलेली गाणी मी ऐकून चिंतनाने वाचली, त्यातली कविता शोधली, एक होता विदुषक, मधील स्वर्गीय आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही माझ्या संग्रही आहेत, "अबोली" चित्रपटातली विनय मांडके यांनी गायलेले आणि निशिकांत सदाफुले यांनी संगीतबद्ध केलेली गाणी त्यातले " डोंगर घाटातली दाटली हिरवी झाडी, किंवा " तुझ्या वाटेला डोळे ओले सुकून गेले पाणमळे.." !!

त्यातच एकोणीसशे नव्यान्नव दोन हजार अशा दरम्यान एक दिर्घ पत्र कवितांसह पळसखेड च्या पत्त्यावर पाठवून दिलं, आणि काही दिवसांनी एक छान शुभ्र लांब लिफाफ्यात आदरणीय दादांच्या अक्षरांत पत्र आलं. पोस्टात आलेलं हे पत्र मला आत्मीक समाधान व आनंद, आणि प्रोत्साहित करणारं होतं.

त्या नंतर कविता लिहिणं, ना. धों.महानोर यांच्या संदर्भात आणि त्यांच्या कविते संदर्भात कुठं वाचण्यात आलं तर ते अधिक तपशीलवार चिंतनाने, रसिकतेने, आदरयुक्त वाचणं असं कायम होत होतं, 

खान्देशात आपले सोयरे पाहुणे आहेत तिकडं पहूर, पळसखेड्याला असे म्हणायचे, पण..त्या भागात कधी जाणं झालेलं नव्हतं, आणि मनात ना. धों.महानोर या प्रतिभासंपन्न व्यक्ती चं आकर्षण आणि मोठेपण, गीतं, कविता मनात होतच. 

दरम्यान एकोणीसशे अठ्ठयान्नव ला खान्देशात जळगाव जिल्ह्य़ातील जामनेर तालुक्यातील पहूर पेठ हे एकुलत्या भगीनीचं सासर झालं आणि औरंगाबाद जिल्ह्य़ातील सोयगाव तालुक्यातील शेवटचं थेट मराठवाडा खान्देश च्या सीमेवरचं गाव पण खान्देशात मिसळून गेलेलं, पहूर, पळसखेड हे सात आठ किलोमीटर अंतरावर ची जवळची गावे, त्यामुळे महानोर यांची भेट मला शक्य होती. 

तरीही अनाहूत एकदम अनोळखी भेटणं योग्य नव्हतच, आणि आपण किती सकस लिहितो, त्या लिहिण्यात काही ताकद असेल का? असे कितीतरी बारीकसारीक न्यूनगंड माझ्या मनात होते. 

औरंगाबाद हून जळगाव हायवेला प्रवास सुरू झाला की, मनात कवीश्री ना. धों.महानोर आणि त्यांचे शब्द, कविता, गाणे नुसता मनात पिंगा घालतं अर्थात हे सर्वांना च खुणावतं असं मात्र मुळीच नाही, बस मधून बाहेरचं लांबवरची शेत दिसतात, डोंगर, झाडं, लोकं असं खूप काही दिसतं, आणि त्यांच्या कविता ,एका खेड्यातला त्यांचा सर्जनशील उच्चतम पातळीवर गेलेला प्रवास, हे सारं काही दिर्घ चिंतनाचं वाटत असतं. दूरवर रानात एखादी बाई दिसली तर वाटतं, की "मी काट्यातून चालून थकले..यातून ती प्रतिमा गीतात आली असेल काय? 

अजिंठ्याच्या डोंगर घाटातून जाताना वाटतं, यातून लिहून गेले असतील काय दादा कि डोंगर काठाले ठाकरवाडी, ठाकरवाडीला झोपडं चारी, आणि सर्जा चित्रपटातला तो उंच डोंगर जणू अजिंठ्याला दिसतो. अजिंठा गाव आलं की पश्चिमेला डोंगर दिसतोय, इथं पारूची कथा घडलीय असं उदास वाटतं, गाडी डोंगर घाटातले वळण उतरत चालते, आणि "मुक्ता" चित्रपटातलं " वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद..हे ऐकू येतं, किंवा अजिंठ्याच्या उंच डोंगरात रविंद्र साठे यांचा पहाडी आवाज घुमतो, " चिंब झाली पावसाने..दूर राने गर्दशी ओली निळाई डोंगराने.." पत्थरांतून निर्झराचे शुभ्र पाणी..वाडी वस्ती प्राणांतून गाती गाणी.." तर तिकडच्या भागातला गौर बंजारा वस्ती पाहताना.." पिकला हंगाम फागव्याची होळी.." चा प्रत्यय येतो, एकूणच पळसखेड च्या वाटेवर प्रवासताना, आणि भोवतालात आणि मातीच्या कणाकणांतून दादांच्या शब्दांचा काव्य गंध दरवळतो त्याचा प्रत्यय येतो, जणू दादांवरील आंतरिक  श्रध्देचा एक सर्जनशील शब्द साक्षात्कार घडतो. आणि तो घडतच राहणार हे मला काहीशा श्रध्देने घडलेल्या सहवासाचे आशिर्वाद वाटतात, हा दुर्लभ पत्रप्रपंच,सहवास प्रसाद मला लाभला! 

कदा पहूरला गेलो असता, आपण ना. धों.महानोर यांच्या भागात आहोत, त्यांना भेटण्यासाठी मनात मोठी आतुरता पण..एवढ्या मोठ्या व्यक्ती ला कसं भेटायचं,ते आमदार होते, आदरणीय शरद पवार यांचे ते खास सख्य असलेले कवी आमदार, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विशेष प्रिय असे ते आहेत, भेटता येईल का? मी कोण ? कुठला? असं काही मनात आदरयुक्त भीतीने दाटून आलेलं होतं. 

सहजच रस्त्यावर ते दिसले. अत्यंत प्रभावी व्यक्तीमत्वं आणि मी " नमस्कार सर..असं बोलून गेलो. ते उंचीपुरी व्यक्ती थबकली नमस्कार केला. आणि पत्रोत्तराचा संदर्भ दिला. काही क्षण वाटणारी भीती जरा विरघळली, ते स्वागतयुक्त हसले, "मी जळगाव ला निघालोय, उद्या या पळसखेडला आणि 

हे माझ्यासाठी खूप मोठ्ठं होतं, 

एकदा मी वाकोद ला उतरून दोन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसखेड ला पायीच गेलो, छोट्याश्या गावातून थेट पाणकळ्या वर..मग भेटल्यावर त्यांनी त्यांच्या गाडीने मला पुन्हा वाकोद ला तर एकदा पहूरला सोडलं. एकदा पहूरला सुरेश मेडिकल मध्ये नाश्ता म्हणून त्यांचेसोबत जिलेबी भज्यांचा अस्वाद घेतल्याची आठवण आहे त्याचे साक्षीदार माझे दाजी श्री. शांताराम अस्कर हे सुध्दा आहेत आम्ही त्यांचे सोबत हा खमंग गोड असा नाश्ता केला होता, एकदा शेतात काही तरी बांध बंदिस्तीचं काम दादा करून घेत होते तेव्हा तर मस्त शेतातच चहापान असा पाहुणचार मला लाभलेला आहे! 

एक नव्हे दोन नव्हे चांगले तीन चार वेळा खास पत्रसंवाद दादांनी माझ्याशी केलेला असून, मी त्यांच्या ही कविते संदर्भात दादांना भरभरून पत्रात लिहायचो, 

दहा ऑक्टोबर दोन हजार चौदा मध्ये मी पहूरला गेलो असता, माझे दाजी श्री. शांताराम अस्कर यांचे बंधू श्री. सुनिल अस्कर यांना असाच शेत वाटेने त्यांच्या रानातच असणाऱ्या पाणकळा येथे त्यांच्या भेटीसाठी गेलो असता, त्यांनी स्वतःच्या हाताने खास फरसाण चिवड्याच्या प्लेट, अगत्याने घेऊन आल्याची आठवण अविस्मरणीयच आहे, 

सोनई येथे यशवंतराव गडाख यांच्या आमृत महोत्सवात आदरणीय दादांची भेट माझ्या साठी शेवटची भेट ठरली तेव्हा त्या अल्पशा भेटीत ऋतुरंग चे अरूण शेवते ही सोबत होते ती यशवंतराव गडाख यांच्या " आमराई "मध्ये झाली होती. 

त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये मी त्यांना कविता संग्रह करायचा अशा अर्थाने त्यांना माझ्या काही कविता पळसखेड ला भरभरून लिहिलेल्या पत्रासह पाठवून दिल्या आणि काही महिन्यांच्या कालावधीत त्यांनी माझ्या कवितेसाठी दोन शब्द भरभरून खास त्यांच्या हस्ताक्षरांत लिहून खास रजिस्टर पोस्ट पार्सलने मला पाठवून दिले.

स्वर्गीय आदरणीय ना. धों.महानोर  ( दादा ) यांचा पत्रप्रपंच,भेटीचा सहवास

मला शब्दांच्या वाटेवर खूप महत्त्वाचा आणि अविस्मरणीय वाटतो. दुर्दैवाने त्या सहवासाचे क्षण टिपून ठेवण्यासाठी माझ्या कडे तेव्हा स्मार्ट फोन अगर कॅमेरा नव्हता, म्हणून हिरव्या शब्दांचे सहवास क्षण मला जतन करता आले नाही, मात्र हिरव्या बोलीचा शब्द कागदावर उमटलेला आहे,  

हा हिरव्या बोलीचा शब्द अनंताच्या प्रवासाला निघून गेला, आता हे रान मुके मलूल वाटते. 

तुझ्या वाटेला डोळे ओले! 

सुकून गेले पाणमळे! 

शब्द वाटेवर..पदोपदी आठवणीने भरून येणाऱ्या.. 

ना. धों.महानोर  ( दादा )

यांना भावपूर्ण 

श्रद्धांजली! 

-  अर्जुन देशमुख  (लेखक प्रगतशील शेतकरी व पत्रकार  आहेत)


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने