Narendra modi : शरद पवारांनी केवळ काका-पुतण्याचे राजकारण करून अनेकांचे पाय ओढले : पंतप्रधान मोदी

 

ब्युरो टीम : शरद पवार यांनी काका-पुतण्याचे राजकारण पुढे रेटून अनेक दिग्गज नेत्यांना कधीच पुढे येऊ दिले नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मंगळवारी रात्री पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील 'रालोआ'च्या (एनडीए) खासदारांना संबोधित करताना काँग्रेससह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराणेशाहीवरही सडकून टीका केली.

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीतील विजयाचा मंत्रही त्यांनी उपस्थित खासदारांना दिला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तिन्ही पक्ष म्हणजे घराणेशाहीचे नमुनेदार उदाहरण असल्याचे सांगून मोदी म्हणाले, पवार यांच्यासह काँग्रेसने अनेक सक्षम नेत्यांना पद्धतशीरपणे डावलून सत्ता स्वतःच्या हाती कशी राहील याची पुरेपूर दक्षता घेतली. राज्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर पुण्यातील कार्यक्रमात मोदी यांना शरद पवारांच्या हस्ते टिळक पुरस्कार देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, मोदी यांनी काँग्रेस, पवार आणि ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.

यावेळी पंतप्रधान झाल्यानंतरची एक आठवण मोदी यांनी सांगितली. ते म्हणाले, मी पंतप्रधान झाल्यानंतर तेव्हाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी तुम्हाला तुमच्या पक्षाने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आणि तुम्ही पक्षाला पूर्ण बहुमत मिळवून दिले, असे राष्ट्रपती मला म्हणाले होते.

उद्धव ठाकरेंवर निशाणा

शिवसेनेशी 2014 मध्ये भाजपची युती होती. ही युती उद्धव ठाकरे यांनी विनाकारण वाद उत्पन्न करून तोडली. आमच्यासोबत सत्तेत असूनही शिवसेनेच्या मुखपत्रातून सरकारवर सातत्याने प्रहार केले जात होते. तेही आम्ही सहन केले. एकीकडे ठाकरे यांना सत्तेतील लाभही घ्यायचे होते आणि दुसरीकडे आमच्यावर टीका करण्याची एकही संधी त्यांना सोडायची नव्हती.

राजकारणात असा दुटप्पीपणा चालत नाही. वास्तविक, आम्हाला बिहारमध्ये 2020 मधील विधानसभा निवडणुकीत जदयुपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. तरीही आम्ही तेव्हा मोठ्या मनाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले.ज्यांना कर्तबगारी दाखवता आली नाही, त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत 'रालोआ'तील सगळे पक्ष एकजुटीने लढतील आणि जे आमच्यासोबत येतील, त्यांचे स्वागतच आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने