Nitish kumar : नितीश कुमार 'यूपी'तून लढणार लोकसभा?

 

ब्युरो टीम :बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशमधून लढणार असल्याच्या चर्चेने राज्यातील राजकारण तापले असून सत्ताधारी महाआघाडी आणि विरोधी भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

नितीश कुमार यांनी शेजारील उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवावी, अशी मागणी होत असल्याचे विधान बिहारचे मंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) उत्तर प्रदेशचे प्रभारी श्रावण कुमार केल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे.

एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना ते म्हणाले, ''मी नुकताच जौनपूरला गेलो होतो. बिहारच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशमधून लढावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली.केवळ फुलपूरच नव्हे तर उत्तर प्रदेशमधील फतेहपूर, प्रतापगडसह अनेक मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांनी लढावे, अशी आमच्या पक्षाची इच्छा आहे.

त्यामुळे राज्यभर खळबळ उडेल, असे त्यांना वाटते,'' असे श्रावण कुमार म्हणाले.'' 'नितीश कुमार यांनी येथून लढावे, अशी उत्तर प्रदेशसह पक्षाच्या अन्य राज्यातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय नितीश कुमार यांचाच असेल,' असे 'जेडीयू'चे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री बिजेंद्र यादव यांनी सांगितले.

नितीश कुमार यांनी गेल्या वर्षी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडल्यापासून २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचा पराभव करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे. तेव्हापासून नितीश कुमार हे उत्तर प्रदेशमधील फुलपूरमधून निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त केला जात आहे.

पूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू करीत असत. प्रयागराजचा मोठा भाग या मतदारसंघात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघापासून फुलपूर १०० किलोमीटर अंतरावर आहे. या मतदारसंघात कुर्मी जातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

नितीश कुमार यांच्या उत्तर प्रदेशमधून लढण्याबद्दल 'जेडीयू'च्या सहकारी पक्षांमध्येही उत्सुकता आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील नेते शकील अहमद खान म्हणाले यांनी नितीश कुमार यांची पाठराखण केली आहे. ''गुजरातमधील व्यक्ती वाराणसीतून लढते आणि विजयही होते तर उत्तर प्रदेश आम्हाला जवळच आहे,'' असे ते म्हणाले.

राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रवक्ते शक्ती यादव म्हणाले, की जर त्या राज्यातील लोकांची तशी इच्छा असेल तर त्यांनी तेथून निवडणूक लढायला हवीच. आमच्या नेत्याची लोकप्रियता बिहारच्या बाहेर पोहचली, हे बिहारसाठी अभिमानाची बाब आहे.

नितीश कुमारांनी गमावली लोकप्रियता

नितीश कुमार उत्तर प्रदेशमधून निवडणुकीत उतरण्याच्या चर्चेवर भाजप नाराज असल्याचे समजते. राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी यावर कडाडून टीका केली आहे. नितीश कुमार यांना स्वतःच्याच राज्यात लोकप्रियता गमावली असून, त्यात शेजारच्या राज्यात गेल्यास त्यांना अपमानाला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले. फुलपूरमधून निवडणूक लढण्यामागे जातीची गणिते असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नितीशकुमार यांनी उत्तर प्रदेशमधील फुलपूर किंवा नालंदातून लोकसभा निवडणूक लढविली, तरी त्यांची अनामत रक्कम जप्त होईल. त्यांनी समर्थन गमावले आहे.

- सुशील कुमार मोदी, माजी उपमुख्यमंत्री, बिहार


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने