Subhedar : 'सुभेदार' चित्रपट हिंदीतही प्रदर्शित करा, उत्तराखंडच्या चाहत्याची मागणी; दिग्पाल लांजेकर म्हणाले...

 

ब्युरो टीम :ब हुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'सुभेदार' हा ऐतिहासिक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या श्री शिवराज अष्टकातील हा पाचवा चित्रपट आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची असीम गाथा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

टीझर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाच्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते. आता या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.


'सुभेदार' चित्रपटाची टीम सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने 'राजश्री मराठी'च्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत उत्तराखंडच्या एका चाहत्याने 'सुभेदार' चित्रपट हिंदीत प्रदर्शित करण्याची मागणी दिग्दर्शकांकडे केली. "उत्तराखंडमध्ये महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श मानले जातात. तिकडच्या लोकांना तुमचे चित्रपट पाहायचे आहेत. चित्रपटात कलाकारांनी फार उत्तम भूमिका साकारल्या आहेत हे टीझरमध्ये दिसून येतं. पण, हिंदीत हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर संपूर्ण देशात तो चालेल. उत्तराखंडमध्ये तुमच्या चित्रपटातील राजं आलं हे गाणंही खूप प्रसिद्ध आहे. माझ्या सगळ्या मित्रांच्या स्टोरीमध्ये हे गाणं असतं," असं चाहता दिग्पाल लांजेकरांना म्हणाला

चाहत्याच्या या प्रश्नावर दिग्पाल लांजेकर उत्तर देत म्हणाले, "सुभेदार चित्रपटाचं हिंदीत डबिंग सुरू आहे. पण हिंदीमध्ये हा चित्रपट सिनेमगृहांत प्रदर्शित केला जाणार नाही. कारण, शेवटी अर्थकारणाचा भाग आहे. पण, हिंदीमध्येही चित्रपट यावा, अशा अनेक कमेंट्स आम्हाला आल्या होत्या. अनेत मेसेजेस आले होते. छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्र नाही तर भारताचे आहेत. म्हणूनच या वेळेस हिंदीमध्येही डबिंग आम्ही करत आहोत. हा चित्रपट ओटीटीवर हिंदीत पाहता यावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत."

'सुभेदार' चित्रपट भारताबरोबरच अन्य सहा देशांतही प्रदर्शित होणार असल्याचं अभिनेत्री मृणाल कुलकर्णींनी सांगितलं. या चित्रपटात अभिनेता अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, चिन्मय मांडलेकर, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने