WFI Elections : निवडणुकीनंतरच निवडचाचणी; वाद टाळण्यासाठी हंगामी समितीचा निर्णय.



ब्युरो टीम : भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक येत्या 12 ऑगस्ट रोजी होणार असून त्यानंतरच जागतिक स्पर्धेसाठीची निवड चाचणी आयोजित करण्यात येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

आंदोलक कुस्तीपटूंना चाचणीतून सवलत दिल्यामुळे वाद निर्माण झाला होता, आता चाचणीदरम्यान पुन्हा एकदा हंगामी समिती वादात सापडू नये यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असून नवी कार्यकारिणी याबाबत निर्णय घेणार असल्याचेही समितीने सांगितले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन लांबल्यानंतर आता जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीवरूनही गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू झाला होता. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या हंगामी समितीकडून ही जबाबदारी निवडणुकीनंतर निवडून येणाऱ्या नव्या कार्यकारिणीवर सोपवण्यात येमार असल्याचे सांगितले गेले आहे.

जागतिक कुस्ती स्पर्धेचे आयोजन बेलग्रेड येथे येत्या 16 ते 24 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत नाव नोंदवण्यासाठी 16 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. संघटनेची निवडणूक 12 ऑगस्टला होणार असून त्यानंतरच निवड चाचणी घेतली जाईल व लगेचच जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. भारताला ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे खेळाडू या चाचणीत कशी कामगिरी करतात व ते स्पर्धेला पात्र ठरतात का याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

आंदोलक कुस्तीपटूंबाबत निर्णय काय होणार…

बजरंग पुनिया, विनेश फोगट व साक्षी मलिक यांच्यासह आंदोलन केलेल्या सगळ्याच कुस्तीपटूंबाबत काय निर्णय नवी कार्यकारणी घेणार असा प्रश्‍न सध्या विचारला जात आहे. भारतीय कुस्तीमहासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत हे आंदोलन सुरू झाले होते. मात्र, केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित झाले. त्यानंतर हंगामी समितीने या कुस्तीपटूंना चाचणीत सवलत दिली होती व त्यामुळे वाद सुरू झाला होता.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने