ब्युरो टीम : आशिया चषकाच्या फायनलमधील भारत-श्रीलंका मुकाबला एकतर्फी झाला. मोहम्मद सिराजने आज ६ विकेट्स घेत यजमानांचाच पाहुणचार घेतला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५० धावांवर माघारी परतल्यानंतर शुबमन गिल व इशान किशन या युवा जोडीने भारताला १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला. भारताने ८व्यांदा आशिया चषक उंचावला
सिराज षटकात ४ विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला... सर्वात कमी चेंडूंत म्हणजेच १६ चेंडूंत ५ विकेट्स घेणाऱ्या चमिंडा वासच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि त्यांचा संपूर्ण संघ १५.२ षटकांत ५० धावांवर माघारी परतला. जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिल्यानंतर सिराजने कंबरडे मोडले. त्यानंतर हार्दिक पांड्याने ३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. सिराजने ७-१-२१-६ अशी अप्रतिम स्पेल टाकली. हार्दिकने ३ व जसप्रीतने १ विकेट घेतली.
माफक लक्ष्याचा पाठलाग करायला इशान किशन व शुबमन गिल ही युवा जोडी मैदानावर आली. या दोघांनी दमदार फटकेबाजी करून ६.१ षटकांत मॅच संपवली. इशान १८ चेंडूंत २३ धावांवर नाबाद राहिला, तर गिलनेही १९ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद २७ धावा केल्या. वन डे क्रिकेटमधील ही दुसरी सर्वात कमी चेंडूंची मॅच झाली. भारत-श्रीलंकेची ही मॅच १२९ चेंडूंत संपली. २०११ मध्ये श्रीलंका वि. झिम्बाब्वे सामना १२० चेंडूंत संपला होता.
टिप्पणी पोस्ट करा