ब्युरो टीम: आशिया चषकात आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. भारतीय संघ सुपर ४ मधील आपला पहिलाच सामना खेळत आहे, तर यजमान पाकिस्तान बांगलादेशला पराभूत इथपर्यंत पोहचला आहे.
लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघासमोर आजचा सामना जिंकून एका दगडात दोन पक्षी मारण्याचे आव्हान आहे. कारण भारताने हा सामना जिंकला तर पाकिस्तानसह बांगलादेशला देखील मोठा फटका बसेल. पाकिस्तानच्या पराभवासह शाकिब अल हसनच्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
दरम्यान, शनिवारी झालेल्या सुपर ४ च्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा २१ धावांनी पराभव केला. सुपर ४ फेरीतील त्यांचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी पाकिस्तानने बांगलादेशचा ७ गडी राखून दारूण पराभव केला होता. भारतीय संघाने आज पाकिस्तानला पराभूत केल्यास बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. तसे झाल्यास बांगलादेश हा स्पर्धेतून बाहेर पडणारा तिसरा संघ ठरेल. नेपाळ आणि अफगाणिस्तानच्या संघांना साखळी फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबोमध्ये होत आहे.
IND vs PAK आज थरार
भारतीय संघाने आज पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली तर टीम इंडियाला दोन गुण मिळतील. पाकिस्तानचे २ सामन्यांत २ गुण राहतील. श्रीलंकेचेही एका सामन्यात २ गुण आहेत, तर बांगलादेशने २ सामने खेळले असले तरी त्यांच्या खात्यात एकही गुण नाही. श्रीलंकेला पुढील २ सामने भारत आणि पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यात १२ सप्टेंबरला सामना होणार आहे. हा सामना कोणत्याही संघाने जिंकल्यास त्या संघाचे चार गुण होतील. अशा स्थितीत बांगलादेशचा संघ ४ गुणांपर्यंत पोहोचू शकणार नाही. बांगलादेशच्या संघाला आतापर्यंत एकदाही आशिया चषकाचे जेतेपद पटकावता आले नाही.
सुपर ४ बद्दल भाष्य करायचे झाले तर, १४ सप्टेंबरला पाकिस्तानचा अंतिम सामना श्रीलंकेशी होणार आहे. दोन्ही संघांचा हा सुपर ४ मधील शेवटचा सामना असेल. जर दोन्ही संघ भारताकडून पराभूत झाले तर २-२ सामन्यांनंतर दोघांचे २-२ गुण होतील. मग १४ तारखेचा सामना जिंकणारा संघ ४ गुणांवर मजल मारेल. अशा स्थितीत भारतीय संघाने आज पाकिस्तानचा पराभव करणे आवश्यक आहे.
टिप्पणी पोस्ट करा